आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 15, 2026
Spread the love

पुणे : एमपीएससीचा अभ्यास करताना झालेल्या मैत्रीतून लग्न केले असताना, पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या पतीने हुंड्यात ४० लाख रुपये, चारचाकी गाडी आणि फ्लॅटची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. तसेच, मारहाण करून शिवीगाळ करत शस्त्राचा धाक दाखवून घटस्फोटासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून सहकारनगर पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

राहुल शेषराव राठोड (वय २९, रा. मोहननगर, धनकवडी, मूळ रा. जयराम तांडा, पाचवेगाव सर्कल, ता. गेवराई, जि. बीड) आणि राजू पवार (रा. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ३१ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल राठोड हे सध्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सहकारनगर पोलीस ठाण्यात नियुक्त आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल राठोड आणि फिर्यादी यांची शनिवार पेठेतील अभ्यासिकेत एमपीएससीचा अभ्यास करत असताना २०२२ ते २०२३ या कालावधीत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला. फिर्यादी यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या तयारीच्या प्रवासात राहुल याला सर्वतोपरी मानसिक, आर्थिक आणि शारीरिक मदत केली. त्याच्या मैदानी चाचणीदरम्यान स्नायू फाटले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी वैद्यकीय उपचारांसाठी २ लाख २० हजार रुपयांची मदत केली.

राहुल याची १ ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. त्याच्या गावाकडे काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतील डीजेसाठी २० हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून राहुलचा भाऊ रोशन राठोड याने घेतले. या मिरवणुकीदरम्यान त्याच्या नातेवाइकांमध्ये मुलगी आपल्या जातीची नसल्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळेपासून राहुल फिर्यादी यांच्यापासून दूर राहू लागला. डिसेंबर २०२४ मध्ये तो गावी राहू लागला. त्याने फिर्यादी यांना सर्व सोशल मीडियावरून ब्लॉक केले होते.

२५ मे २०२५ रोजी राहुल याने फिर्यादी यांना आपले नाते संपल्याचे सांगितले. घरचे मुलगी पाहतील, त्यानुसार लग्न करणार आहे. घरच्यांनी किती हुंडा घ्यायचा, हेही ठरवले आहे. आता तू तुझे बघ, असे सांगून तो कायमचा घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर देवदर्शनासाठी जाण्यासाठी २० हजार रुपये पाठवण्यास त्याने सांगितले. फिर्यादी यांनी त्याला पैसे पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार मागे घेण्यासाठी आणि लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर राहुल याने लग्नासाठी सुरुवातीला २५ लाख रुपये, तर त्यानंतर ४० लाख रुपये हुंडा देण्याची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल याच्या प्रशिक्षणासाठी नाशिक येथे गेल्यानंतरही त्याने संपर्क मर्यादित ठेवला. त्याच्या नातेवाइकांकडून हुंड्यासाठी वारंवार विचारणा केली जात होती. राजू पवार हे तुमच्या बहिणीला किती हुंडा दिला होता, अशी विचारणा करत असत. राहुलने फोन उचलला नाही, तर फिर्यादी राजू पवार यांना फोन करत असत. त्यावेळी ते हुंड्याविषयी विचारणा करून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर १२ सप्टेंबर २०२५ रोजी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने आळंदी येथील मंगल कार्यालयात त्यांचा विवाह झाला. मात्र, लग्नानंतरही राहुलचे वर्तन बदलले नाही. त्याने फिर्यादी यांना सासरी नेले नाही, सणासुदीला योग्य वागणूक दिली नाही, तसेच भेटणे आणि बोलणे टाळले, असा आरोप आहे. महिला आयोग आणि भरोसा सेलमध्येही याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या.

जून २०२६ मध्ये धनकवडीतील मोहननगर परिसरात दोघे एकत्र राहू लागल्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. घराचे भाडे, डिपॉझिट आणि घरखर्च अर्धा-अर्धा देण्याची मागणी राहुल याने केली. त्यानंतर चारचाकी गाडी घेऊन देण्यासाठी दबाव टाकला. ‘तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही,’ असे बोलून अपमान केला. घटस्फोट घेण्यासाठी वारंवार दबाव टाकल्याचाही आरोप आहे.

२९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री अन्य महिलेशी फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी राहुल याने शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ केल्याचा, तसेच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर फिर्यादी काही दिवस माहेरी राहिल्या होत्या.

१२ ऑक्टोबर रोजी सकाळी राहुल कार्यालयात जाताना मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करून आरडाओरडा करू लागला. ‘मला मारू नकोस, माझ्या अंगावर झटू नकोस, तुला लाज वाटली पाहिजे, नवरा पोलीस अधिकारी आहे. तुला जेवण बनवायला जमत नाही, नवरा कपडे बाहेर धुवायला टाकतो,’ असे म्हणत तो फ्लॅटबाहेर येऊन आरडाओरडा करू लागला. ‘मला माझी बायको मारते आहे, तिच्या डोक्यात फरक झालेला आहे,’ असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. त्यावेळी शेजारी-पाजारी आपल्याकडे पाहू लागले. त्यामुळे आपल्याला संकोचल्यासारखे वाटू लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक राजेश खांडवे तपास करत आहेत.

  • एमपीएससीचा अभ्यास करताना जमले प्रेम
  • पीएसआयच्या तयारीच्या प्रवासात तरुणीने केली मोठी आर्थिक मदत
  • पीएसआय म्हणून निवड झाल्यानंतर तरुणाचा विचार बदलला
  • पोलिसांत तक्रार केल्याने नाइलाजाने केले लग्न
  • पत्नीप्रमाणे वागणूक न देता सासरी नेले नाही
  • घटस्फोटासाठी शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केल्याचा आरोप