आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणारे महिलेसह तिघे चोरटे गजाआड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 15, 2026
Spread the love

पुणे : बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी नर्‍हे पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून ही कारवाई केली.

संचिता सचिन गोसावी (वय ४२), दत्ता अरुण कदम (वय ३९) आणि दीपक बाळू ढेरंगे (वय ३४, तिघेही रा. नर्‍हे, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्‍हे परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातून सुमारे एक लाख रुपये किमतीचा दीड तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, सोन्याची कर्णफुले आणि २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती.

याप्रकरणी नर्‍हे पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांच्या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली.

पोलीस हवालदार प्रणिल मेस्त्री यांनी आरोपींच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून आरोपी नर्‍हे येथील अभिनव कॉलेज रस्त्यावरील शुभंकर हाइट्स परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संचिता गोसावी, दत्ता कदम आणि दीपक ढेरंगे या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे तपास करत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार प्रणिल मेस्त्री, निलेश भोरडे, पांडुरंग पवार, देवा चव्हाण, स्वप्नील सूर्यवंशी, सुनील चव्हाण, राजू तोरे, सुमित जगताप, नितीन वाघमारे, धुळा गारळे, गोविंद कपाटे आणि कार्तिक कोंडे यांनी केली आहे.