अल्पवयीन मुलाच्या डोक्यात वार करून खुनाचा प्रयत्न
एकमेकांकडे पाहण्यावरून वाद : भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांवर केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या चौघांमध्ये एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला. त्या रागातून एकाने कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेत शुभम गणेश करपेवार (वय १७, रा. शिवांजली निवास, दत्तनगर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ओरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. करपेवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रेम वावळकर (वय १८, रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव) याला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा चौक येथे बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र अथर्व प्रदीप खोले (वय १७, रा. शिवांजली निवास, दत्तनगर चौक) हे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ते बुधवारी रात्री १० वाजता चंद्रभागा चौकातून पायी घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा प्रेम वावळकर आणि एक अल्पवयीन मुलगा समोर आले. त्यांनी फिर्यादी यांना ‘काय बघतोस?’ असे म्हणत शिवीगाळ केली. तेव्हा अथर्व खोले याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी, ‘तुला लय मस्ती आलीय, तुला आज मारूनच टाकतो,’ असे म्हणत हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस वार केला. त्यानंतर डोक्याच्या पुढील बाजूस दुसरा वार केला. अथर्व खोले याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिसरा वार अथर्व याच्या हातावर करून त्याला जखमी केले.
गंभीर अवस्थेत फिर्यादी यांना ओरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव तपास करत आहेत.
