आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणावर कोयत्याने वार करून निर्घृण खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 16, 2026
Spread the love

पुणे : दोन वर्षांपूर्वी मारहाण केल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने दोन साथीदारांच्या मदतीने तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला. लोणीकंद पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. कोरेगाव भीमा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत त्याचा मोठा भाऊ आकाशकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २३, रा. कोरेगाव भीमा) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वढू खुर्द येथील सार्वजनिक रस्त्यावर १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकुमार श्रीवास्तव हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो कोरेगाव भीमा येथे राहत असून, वडिलांसोबत एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. आरोपी मुलांनी दहावीनंतर शिक्षण सोडले आहे.

विकासकुमारने दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. त्यावेळी त्याने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. चार-पाच दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते.

हा राग मनात धरून या अल्पवयीन मुलाने अन्य दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने विकासकुमार श्रीवास्तव याला मारण्याचा कट रचला.

विकासकुमार वढू खुर्द येथील आमदारनगर परिसरात सायंकाळी थांबला असताना या अल्पवयीन मुलांनी त्याला घेरले. त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर आणि छातीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यामुळे विकासकुमारचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना समजल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.