पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६ जणांची फसवणूक
सफाई कामगार म्हणून नोकरी लावण्याच्या नावाखाली १३ लाख ७२ हजार रुपये घेतले; कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सहा जणांची १३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सचिन बबन भालेराव (वय ४३, रा. जगतापनगर, थेरगाव गावठाण) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष वाल्हेकर (वय ४०, रा. नायडू हॉस्पिटल परिसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ढोले पाटील रोडवरील बोट क्लब रोड येथील गणपती मंदिराजवळ मे २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात झाली होती. संतोष वाल्हेकर याने फिर्यादी आणि त्यांच्या पाच मित्रांना पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ७२ हजार रुपये घेतले.
त्यानंतर त्याने वर्षभर नोकरी लावण्याचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात नोकरी लावली नाही. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी पैसे परत मागितले असता, त्याने पैसेही परत केले नाहीत. अखेर या तरुणांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
