आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

म्युनिशन इंडियाच्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 16, 2026
Spread the love

पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाचखोरीच्या एका प्रकरणात पुण्यात मुख्यालय असलेल्या म्युनिशन इंडिया लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी संचालकासह दोन खासगी व्यक्तींना अटक केली आहे. कार्यकारी संचालकाच्या घरी सीबीआयने झडती घेतली असता, तब्बल १ कोटी ७३ लाख रुपयांची रोकड आढळून आली. याशिवाय, अटक केलेल्या आरोपींच्या म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्ली येथील ठिकाणी घेतलेल्या झडतीत ५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये ड्रोन आणि दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

म्युनिशन इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनिलकुमार बी. आर., त्यांचा भाऊ बी. हर्षवर्धन आणि लाच देणारे एसएमपीपी लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक आशिष कन्सल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आशिष कन्सल याला दिल्लीतून अटक करून पुण्यात आणण्यात आले. त्यांना पुण्यातील न्यायालयात हजर केले असता, अधिक तपासासाठी न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कंपनी म्युनिशन इंडियामधील सरकारी कामे खासगी कंत्राटदार आणि पुरवठादारांना मिळवून देण्यासाठी लाच घेतली जात असल्याचा आरोप आहे. तसेच, अनिलकुमार हे संरक्षण उत्पादन, खरेदी आणि इतर धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित संवेदनशील माहिती उघड करण्याच्या बदल्यात लाच मागत असून ती स्वीकारत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती.

अशा प्रकारची माहिती उघड झाल्यामुळे देशाचे धोरणात्मक आणि सुरक्षा हित धोक्यात येऊ शकते. तसेच, संरक्षणाशी संबंधित प्रक्रियेची विश्वासार्हता कमी होऊन राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेसमोर गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. हे लक्षात घेऊन सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. त्यानंतर अनिलकुमार यांच्या येरवडा येथील सरकारी निवासस्थानी झडती घेण्यात आली. या झडतीत १ कोटी ७३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. यावेळी ही रोकड दुसरीकडे नेण्याच्या तयारीत असलेल्या हर्षवर्धनला सीबीआयने अटक केली.

एसएमपीपी लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कन्सल हे अनिलकुमार यांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कंपनी ड्रोन तंत्रज्ञान आणि दारुगोळा निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीला एका वर्षाच्या कालावधीत दारुगोळा पुरवण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे अधिकृत कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करीत आहे.

१५० वर्षांची परंपरा असलेली कंपनी

म्युनिशन इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कंपनी असून, भारतातील दारुगोळा उत्पादन करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. एमआयएल लष्कर, नौदल, हवाई दल आणि निमलष्करी दलांसाठी विविध प्रकारच्या दारुगोळ्याचे आणि स्फोटकांचे उत्पादन, चाचणी, संशोधन व विकास तसेच विपणनाचे काम करते.
या कंपनीचे मुख्यालय पुण्यात असून, देशभरात तिची १२ अत्याधुनिक उत्पादन केंद्रे आहेत. कंपनीत सुमारे २५ हजार कुशल कर्मचारी कार्यरत आहेत. ही कंपनी गेल्या १५० वर्षांपासून दारुगोळा उत्पादनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.