गणेशोत्सवात भाविकांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा छडा
फरासखाना पोलिसांकडून २१ लाखांचा ऐवज जप्त : १३ गुन्हे उघडकीस, उत्तर प्रदेशातील टोळी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवात भाविकांचे दागिने कटरने कापून चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीचा फरासखाना पोलिसांनी छडा लावला आहे. त्यातील एकाला अटक करून त्याच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणले असून, २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
विजयपाल कवर सेन (वय ३४, रा. इस्लामपूर, घसौली, जि. शामली, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आणि त्याच्या इतर पाच साथीदारांनी या चोऱ्या केल्या आहेत.
फिर्यादी सागर कोमटी आणि त्यांचा मित्र २५ सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजता शिवाजी रोडवरील बेलबाग चौकात गणेशोत्सवाच्या विजय मिरवणुकीत सहभागी झाले होते.
त्यावेळी त्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरला. तसेच त्यांच्या गळ्यातील १ लाख २१ हजार रुपये किमतीची ३८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली होती.
फरासखाना पोलिसांनी सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. तपास पथकातील पोलीस अंमलदार गजानन सोनुने आणि चेतन होळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत हा गुन्हा उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील गुन्हेगारांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी विजयपाल कवर सेन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आणखी पाच साथीदारांसह हे गुन्हे केल्याचे कबूल केले.
पोलीस पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन आरोपींचा शोध घेतला. आरोपीकडून चोरी केलेले १३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरलेला मोबाईल, चाकू आणि कटर असा २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या टोळीने केलेले चैन चोरी आणि मंगळसूत्र चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, राजेश महाला, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल आवाड, नितीन जाधव, चेतन होळकर, श्रीकांत वाघवले, अजित शेख, प्रवीण पासलकर, विशाल शिंदे, महेश राठोड, सुमित खुट्टे, ज्ञानेश्वर पांचाळ, प्रशांत पालांडे, महेश पवार, रजत राजेशिर्के आणि अविनाश दरवडे यांनी केली आहे.
