आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आरटीओचा ‘रॅपिडो’ला मोठा दणका

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 17, 2026
Spread the love

पुणे : मोटार वाहन अॅग्रीगेटर नियमावली २०२६ नुसार, परिवहनेतर दुचाकी वाहनांसाठी बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी अतिरिक्त परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही रॅपिडो अॅपद्वारे दुचाकी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो कंपनीला परिवहन विभागाने (आरटीओ) मोठा दणका दिला आहे. बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोटार वाहन निरीक्षक प्रसाद गोवर्धन सुरवसे (वय ३४) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (रॅपिडो) कंपनी (रा. कृषाई बिल्डिंग, सांगवीनगर, परिहार चौकाजवळ, औंध) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोटार वाहन निरीक्षकांनी बनावट ग्राहक बनून अॅपवरून दुचाकी बुक केली आणि ही कारवाई केली. रॅपिडो अॅपच्या माध्यमातून परिवहनेतर दुचाकी वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या कंपनीच्या चालकांची कोणत्याही प्रकारची चारित्र्य पडताळणी किंवा इतर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तपासणी केली जात नाही. ही बाब महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

रॅपिडो अॅप चालविणाऱ्या रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीने आरटीए पुणे यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, आरटीएने हा अर्ज फेटाळला आहे.

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही कंपनीची अपिले फेटाळली आहेत. रोपेन ट्रान्सपोर्टने परिवहन आयुक्तांकडे अॅग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, कंपनीला अद्याप अॅग्रीगेटर परवाना मिळालेला नाही.

रॅपिडो कंपनीकडून कोणताही परवाना नसताना वाहतूक सुरू असल्याने परिवहन आयुक्तांनी कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

तसेच परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यात सुरू केलेले अवैध बाईक टॅक्सी संचालन तात्काळ पूर्णपणे बंद करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. तरीही अवैध प्रवासी वाहतूक सुरू होती.

रॅपिडो अॅपच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय निकम, प्राजक्ता गोडसे व चालक विशाल डोंबाळे हे विश्रांतवाडी परिसरात गस्त घालत होते.

फिर्यादी यांनी रॅपिडो अॅप्लिकेशनद्वारे बाईक बुक केली. येरवडा कॉमर्जोन ते कोथरूड बस डेपो अशी बाईक राइड बुक करण्यात आली. १३ किलोमीटरच्या या राइडसाठी १७९ रुपये भाडे दाखविण्यात आले.

काही वेळानंतर मोटारसायकल चालक शुभम आठवले (वय ३३, रा. प्रतीकनगर, येरवडा) हा दुचाकी घेऊन आला. चौकशीनंतर त्याची दुचाकी जप्त करून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.