आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

समाजातील नकारात्मक शक्तींविरुद्ध महिलांचा लढा आजही सुरूच : नामदार माधुरी मिसाळ

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 19, 2026
Spread the love

पुणे : स्त्री ही केवळ त्यागमूर्ती नसून शक्ती, संघर्ष आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. स्त्रीला केवळ आदर्शाच्या चौकटीत अडकवू नये. तिने आजवर मोठ्या प्रमाणात त्याग केला आहे. देवीने महिषासुर, चंड-मुंड यांसारख्या राक्षसांचा संहार केला, त्याचप्रमाणे आजची स्त्रीदेखील समाजातील अन्याय, विषमता आणि नकारात्मक शक्तींविरुद्ध समर्थपणे लढा देत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री नामदार माधुरी मिसाळ यांनी केले.

श्री भवानी माताजी जैन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी श्री चामुंडा भवानी माताजी मंदिर, भिलारेवाडी, कात्रज येथे ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ आणि ‘आदर्श माता पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या पुरस्कारांचे वितरण नामदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष राजेश नाहार यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, मातृशक्तीचा सन्मान करणे आणि समाजातील प्रेरणादायी महिलांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

नामदार माधुरी मिसाळ पुढे म्हणाल्या की, महिलांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. समाजाने महिलांकडून केवळ त्यागाची अपेक्षा न ठेवता त्यांना योग्य सन्मान, समान संधी आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.

महिलांच्या कर्तृत्वाला वाव दिल्यास त्या समाजाच्या प्रगतीत अधिक प्रभावी योगदान देऊ शकतात. या सोहळ्याला ट्रस्टचे श्रीकांत नाहार, संपतराज नाहार, सुभाष नाहार, राजेश नाहार, मनोज नाहार, अंजली नाहार आणि गौरव नाहार यांच्यासह ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या, युवा कार्यकर्ते आणि नाहार परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त महिलांनी आपल्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासातील अनुभव कथन केले. त्यांच्या मनोगतांनी उपस्थितांची मने जिंकली आणि महिलांच्या कर्तृत्वाचा तसेच जिद्दीचा गौरव करणारा संदेश दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, महिला मंडळ, युवा कार्यकर्ते आणि समस्त नाहार परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मातृत्व, स्त्रीशक्ती आणि समाजसेवेचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले, तर प्रकाश नाहार यांनी आभार मानले.