आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मारहाण करून तरुणाला लुबाडणाऱ्या दोघांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 20, 2026
Spread the love

पुणे : दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चौघांनी त्याला मारहाण करून गळ्यातील सोनसाखळी, रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. बिबवेवाडी पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली आहे.

याबाबत संदीप लक्ष्मण जागडे (वय ४२, रा. जागडे बिल्डिंग, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सनी संजय साळवी (वय २७) आणि मयूर सचिन भोसले (वय २१, दोघे रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार संदीप ऊर्फ सॅडी चव्हाण आणि सनी भरगुडे यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता बिबवेवाडीतील पापळ वस्ती येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोटारसायकलवरून दांडिया पाहण्यासाठी पापळ वस्ती येथे गेले होते. त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी फिर्यादी यांना, ‘‘आमच्या सॅंडी भाईचा बर्थडे आहे. आम्हाला दारू प्यायला पैसे दे,’’ असे सांगितले. फिर्यादी यांनी नकार देताच त्यांनी लाथाबुक्क्यांनी जागडे यांना मारहाण करून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.

संदीप जागडे यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यापैकी दोघांना अटक केली आहे. सनी साळवी याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि आर्म अॅक्टखाली गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक भुवड तपास करीत आहेत.