कामगारांच्या सन्मानासाठी क्रेडाईचा स्तुत्य उपक्रम
‘प्राईड बेस्ट लेबर कॅम्प फॅसिलिटी अवॉर्ड्स २०२६’ : डॉ. राजेश शहा यांची विशेष उपस्थिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकाम क्षेत्रात कार्यरत कामगारांना सुरक्षित निवास, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा आणि सन्मानजनक जीवनमान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आयोजित ‘प्राईड बेस्ट लेबर कॅम्प फॅसिलिटी अवॉर्ड्स २०२६’ हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांनी व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्यात डॉ. शहा विशेष आमंत्रित म्हणून सहभागी झाले होते.
बांधकाम कामगारांच्या कल्याणाला प्राधान्य देत त्यांच्या राहणीमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
बांधकाम उद्योगाच्या विकासात कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. इमारती आणि विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे.
ही बाब लक्षात घेऊन क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे या पुरस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत कामगारांसाठी केवळ निवासाची व्यवस्था करण्यापुरता विचार मर्यादित न ठेवता, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षित निवासव्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधांसह सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो.
कामगारांसाठी उत्तम सुविधा निर्माण करणाऱ्या विकासकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी डॉ. राजेश शहा म्हणाले, “सुदृढ आणि सर्वसमावेशक समाजाच्या उभारणीसाठी आरोग्य आणि कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे.
आरोग्यसेवा गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा, आरोग्य संस्था आणि समाजातील विविध घटकांची भूमिका महत्त्वाची असते.
आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे, जनजागृती वाढवणे आणि दर्जेदार आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ करणे यासाठी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.
सामूहिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून आपण अधिक निरोगी भविष्य घडवू शकतो आणि नागरिकांचे जीवनमान सुधारू शकतो.”
या कार्यक्रमाला भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनीष जैन, जयप्रकाश श्रॉफ, अरविंद जैन, क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी, व्यवस्थापन समितीचे सदस्य, कामगार कल्याण समिती व आयोजन समितीचे प्रतिनिधी, पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रतिष्ठित विकासक, स्पर्धेत सहभागी झालेले विकासक आणि पुरस्कार विजेते उपस्थित होते.
बांधकाम कामगारांना मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा, तसेच त्यांच्या कल्याणासाठी बांधकाम क्षेत्रातील संस्थांनी पुढाकार घ्यावा, या दृष्टीने ‘प्राईड बेस्ट लेबर कॅम्प फॅसिलिटी अवॉर्ड्स २०२६’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
