राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करणारे तिघे जेरबंद
दोन लाखांची दिली होती सुपारी : बारामतीतील घटना, पुणे आणि भिगवणमधून आरोपींना घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
पार्थ वासुदेव अवथळे (वय १९, रा. पिंपरी गवरी, बुलढाणा, सध्या रा. स्पेन्सर चौक, कर्वेनगर) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. वीट, करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. साई लीला बिल्डिंग, थोरात नगर, भिगवण, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास बारामतीमधील विमानतळाजवळ, पायलट ढाब्याजवळील पालखी महामार्गावर घडली होती.
राणा दिलीप सूर्यवंशी हे जागेची पाहणी करत होते. त्यावेळी स्कूटीवरून दोन मुले आली. त्यातील एकाने राणा यांना बुके दिला. त्यावेळी राणा यांनी पोलीस अंमलदार नितीन यांच्याकडे फोटो काढण्यासाठी मोबाईल दिला.
मुलाने मास्क लावलेला असल्याने राणा यांनी, “अरे, तू मास्क का लावला आहेस? फोटो कसा येणार? तो मास्क काढ,” असे म्हटले. त्याचवेळी अचानक त्या मुलाने पिस्तूल काढून राणा यांच्या दिशेने गोळीबार केला.
तेव्हा फट असा आवाज झाला. प्रसंगावधान राखून राणा यांनी मुलाच्या हातावर फटका मारला. त्यामुळे त्याच्या हातातून पिस्तूल खाली रस्त्यावर पडले.
त्याचवेळी या मुलाने सत्तूर काढून राणा यांच्या उजव्या हाताच्या दंडावर लोखंडी सत्तूरने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर तो मुलगा सत्तूर खाली टाकून पळून जाऊ लागला.
पोलीस अंमलदार नितीन यांनी पाठलाग करून दोघांपैकी एकाला पकडले. राणा यांच्या ताफ्यातील पुढील गाडीमध्ये बसवून घेऊन जात असताना त्या मुलाने नितीन यांच्या हाताला तोंडाने चावा घेतला आणि बाजूच्या शेतात उडी मारून तो पळून गेला.
गंभीर जखमी झालेल्या राणा सूर्यवंशी यांना तातडीने पुण्यात आणण्यात आले. बारामती तालुका पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
तांत्रिक तपासात दोघे जण कर्वेनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. बारामती पोलिसांनी ही माहिती गुन्हे शाखेला दिली. गुन्हे शाखेतील तीन पथकांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला. अल्पवयीन मुलासह पार्थ याला कर्वेनगर परिसरात पकडून सोमवारी रात्री बारामती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ज्ञानदेव शिंदे याने त्यांना दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी ज्ञानदेव शिंदे याला भिगवण परिसरातून पकडले.
पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे यांना बारामती न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने अधिक तपासासाठी २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार अधिक तपास करत आहेत.
