आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 21, 2026
Spread the love

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करून आणि मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला घरमालकाने लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले.

विशाल माधवराव बिच्चेवाड (वय ३९, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी त्याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशाल बिच्चेवाड हा सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून नोकरी करतो.

आमदार जितेंद्र आव्हाड यांना १९ ऑक्टोबर रोजी रात्री दोन ते तीन वेळा फोन करून आणि मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ‘तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग. आधी जित्याला गोळ्या घालेन,’ असे म्हणत त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आव्हाड यांनी ही बाब स्वतः पत्रकारांना सांगितली.

दरम्यान, दूरचित्रवाणीवरील बातम्यांमध्ये ही घटना पाहिल्यानंतर घरमालकाच्या लक्षात आले की, आपल्याकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या विशाल बिच्चेवाड यानेच ही धमकी दिली असावी. त्यानंतर घरमालकाने तातडीने त्याला पकडून लोणीकंद पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक तातडीने लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी विशाल बिच्चेवाड याला ताब्यात घेऊन नोटीस बजावली.