आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

४५० दृष्टिबाधितांना दिवाळी शिध्याचे वाटप

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 26, 2026
Spread the love

पुणे : द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० दृष्टिबाधित व्यक्तींना दिवाळीनिमित्त शिध्याचे वाटप करण्यात आले. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता येथील द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात पुणे शहर व परिसरातील दृष्टिबाधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा आणि कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडाचे अध्यक्ष दिनेश जोशी, प्रकल्प संचालक श्रीनिवास पाळंदे, नारायण चांडक आणि अभिनव सेवा फाउंडेशनचे सुनील गोवर्धन यांची उपस्थिती होती.

काश्मिरा ठाकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. दृष्टिबाधित व्यक्तींची दिवाळी आनंददायी व्हावी आणि त्यांनाही सणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे.

या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत दृष्टिबाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था १९५२ पासून दृष्टिबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक दृष्टिहीन व्यक्ती या संस्थेच्या विविध प्रकल्पांचा लाभ घेत आहेत.

संस्थेच्या माध्यमातून दृष्टिबाधित व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.