आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लाच घेताना वन विभागाचा वनपाल जाळ्यात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 26, 2026
Spread the love

पुणे : पावसाळ्यात शेतातील माती पावसामुळे नीरा नदीत वाहून गेली होती. त्यामुळे शेतकरी नदीपात्रातील माती शेतात टाकत असताना वनपालाने त्याला मज्जाव करून कारवाईची भीती दाखवली. त्यानंतर लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनपालाला रंगेहाथ पकडले.

जहीर सिराज शेख (वय ४७, रा. निशिका अपार्टमेंट, जळुची रोड, जिजाऊ मंगल कार्यालयाशेजारी, बारामती) असे या वनपालाचे नाव आहे. बारामती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात करंज राऊंड ऑफिसर म्हणून त्याची नेमणूक आहे.

तक्रारदाराची बारामतीतील कोऱ्हाळे खुर्द येथे ४ हेक्टर शेतजमीन आहे. या शेतातील माती पावसामुळे नीरा नदीत वाहून गेली होती. त्यामुळे ते नदीपात्रातील माती शेतात टाकत होते.

त्यावेळी वनपाल जहीर शेख याने २६ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रारदाराचे काम बंद करून ही जागा वन विभागाच्या मालकीची असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदारावर कारवाई करण्याची भीती घालून मातीचा भराव करण्यास मज्जाव केला.

त्यावेळी तक्रारदाराने कारवाई न करता काम बंद न पाडण्याची विनंती केली. तेव्हा जहीर शेख याने कारवाई न करता काम सुरू ठेवण्यासाठी त्याच्या सहकारी भुमरे मॅडम आणि स्वतःसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

त्यापैकी ४ हजार रुपये त्याने त्याच दिवशी स्वीकारले. उर्वरित ६ हजार रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नका, असे सांगून त्याने पुन्हा लाचेची मागणी केली.

तक्रारदाराची तक्रार १४ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या तक्रारीची पडताळणी २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

वनपाल जहीर शेख याने यापूर्वी ४ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाच मागणीच्या अनुषंगाने २५ ऑक्टोबर रोजी दुपारी माळेगाव येथील आयटीआयसमोरील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून ६ हजार रुपये स्वीकारताना वनपाल जहीर शेख याला पकडण्यात आले. माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून वनपाल जहीर शेख याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.