पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांनी न्यायव्यवस्थेचे प्रत्यक्ष स्वरूप समजून घ्यावे
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत : सूर्यदत्त लॉ कॉलेजमध्ये न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : “कायदा हा केवळ न्यायालयीन कामकाजापुरता किंवा कायद्याच्या पुस्तकांपुरता मर्यादित नसून, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मालमत्तेचे व्यवहार, ग्राहकांचे हक्क, वाहतुकीचे नियम, कौटुंबिक संबंध आणि मूलभूत अधिकार अशा अनेक बाबींमध्ये कायद्याचे महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला कायद्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त लॉ कॉलेजमध्ये ‘दैनंदिन जीवनातील कायद्याचे महत्त्व’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात संजय देशमुख बोलत होते.
यावेळी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक तायवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय देशमुख यांना ‘सूर्यभारत सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. न्यायमूर्ती देशमुख यांनी विद्यार्थ्यांना कायद्याशी संबंधित प्रश्न विचारून त्यांच्या आकलनाची आणि तर्कशक्तीची पडताळणी केली.
प्रथम वर्षातील बीबीए एलएलबीची विद्यार्थिनी मानसी भुबड हिने अचूक उत्तरे दिल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. न्यायमूर्ती संजय देशमुख म्हणाले, “कायद्याचे ज्ञान नागरिकांना आपल्या अधिकारांचे संरक्षण करण्यास आणि कर्तव्यांची जाणीव ठेवण्यास मदत करते.
कायद्याचा आदर, नियमांचे पालन आणि वादांचे सामंजस्याने निराकरण यांमुळे समाजात न्याय, समानता आणि सुव्यवस्था टिकून राहते.
कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचार, तर्कशुद्ध विश्लेषण, व्यावसायिक नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी.
कायद्याचे ज्ञान सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगी पडणे आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याचा प्रभावी वापर होणे महत्त्वाचे आहे.”
दैनंदिन व्यवहारांमध्ये कायदेशीर बाबींचे ज्ञान असल्यास योग्य निर्णय घेणे, संभाव्य अडचणी टाळणे आणि अन्याय झाल्यास योग्य मार्गाने दाद मागणे शक्य होते.
समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी, वादांचे सामोपचाराने निराकरण करण्यासाठी तसेच न्याय, समानता आणि निष्पक्षतेची मूल्ये जपण्यासाठी कायद्याचे राज्य महत्त्वाचे आहे.
कायद्याचे ज्ञान सामान्य नागरिकांच्या हितासाठी वापरणे आणि समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हे भावी कायदेतज्ज्ञांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला बीबीए एलएलबी, बीए एलएलबी, एलएलएम आणि पदविका अभ्यासक्रमांचे ४०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयातील मूट कोर्ट सभागृह, प्रशस्त दालने आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांचे न्यायमूर्ती देशमुख यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि प्राध्यापकांची शैक्षणिक क्षेत्रातील बांधिलकी यांचीही त्यांनी प्रशंसा केली.
डॉ. दीपक तायवाडे यांनी प्रास्ताविक केले. सारा जाधव, अन्वेषा गायकवाड आणि कृष्णा दायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. सानिका हिने आभार मानले.
“न्यायव्यवस्थेतील मान्यवरांशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणल्याने त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळते. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना न्यायदान प्रक्रियेचे स्वरूप समजते आणि कायदे क्षेत्रातील जबाबदाऱ्यांची जाणीव होते. न्यायमूर्तींसारख्या अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच न्यायव्यवस्थेचे प्रत्यक्ष स्वरूप समजण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी अशा संधींचा लाभ घेऊन आपले ज्ञान, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी विकसित करावी.” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष – सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

