पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार जेरबंद
बाणेर पोलिसांची कामगिरी : गावठी पिस्तूल, २ काडतुसे जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सराईत गुन्हेगाराला बाणेर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
आदित्य दशरथ औचरे (वय २२, रा. शिवनेरी पार्क, बालेवाडी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. बाणेर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश भोईने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बालेवाडी हायस्ट्रीट येथील मोकळ्या जागेत एक जण गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी हायस्ट्रीट येथील मैदानात जाऊन आदित्य औचरे याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल व मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली. बाणेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला आणि सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण, गणेश रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, अतुल इंगळे, प्रदीप खरात, गजानन अवातिरक, स्वप्नील मराठे, गणेश भोईने आणि समीर पवार यांनी केली.
