भरदिवसा तरुणीला उचलून पळवून नेण्याचा प्रयत्न
कात्रज-कोंढवा रोडवरील घटना : नागरिकांनी दिला नराधमाला चोप, भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीचा विनयभंग करून तिला उचलून नेऊन अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला. ही घटना कात्रजमधील सुखसागरनगर येथील विद्यानगरमधील समर्थ डेअरीजवळ २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, सध्या रा. विद्यानगर, कात्रज-कोंढवा रोड; मूळ रा. हदगवा, ता. अख्तियार कोटाली, ता. भद्री कुंडा, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत एका १८ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी सायंकाळी साडेसहा वाजता कात्रज-कोंढवा रोडवरील समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती.
त्यावेळी आरोपी तेथे आला. त्याने या तरुणीचा शर्ट ओढून तिला उचलले. तिने आरडाओरडा केला. आवाज ऐकून तिची मैत्रीण धावत आली. तिने आरोपीला जोरात धक्का दिला. तरीही त्याने तरुणीला सोडले नाही.
त्यानंतर दोघींनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून मैत्रिणीची काकी आणि आणखी एक व्यक्ती धावून आले. त्या दोघांनी तरुणीला आरोपीच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा आरोपीने त्यांचा मोबाईल जमिनीवर फेकून फोडला. हा प्रकार पाहून तेथे नागरिक जमले. त्यांनी आरोपीला पकडून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तरुणीला सोडले.
कोणीतरी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि कात्रज पोलीस चौकीत नेले.
या घटनेत तरुणीच्या हाताला दुखापत झाली आहे. आरोपी मानसिक रुग्ण असून, त्याने यापूर्वीही दोन ते तीन वेळा अशाच प्रकारचे कृत्य केले होते.
त्या वेळी नागरिकांनी त्याला मारहाण केली होती; मात्र तेव्हा कोणीही तक्रार दिली नव्हती. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
