व्हीआयपी पोलीस सुरक्षा मिळावी, यासाठी घडवून आणला हल्ला
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण : ४ आरोपींना अटक, एक अल्पवयीन ताब्यात, दोघे फरार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर १८ ऑक्टोबर रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सुपारी देणारे दोघे जण अद्याप फरार आहेत. तीन जिल्ह्यांतील पोलिसांचे संरक्षण असलेल्या राणा सूर्यवंशी यांनी आपल्याला व्हीआयपीप्रमाणे पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गुन्ह्यातील ज्ञानेश्वर साळुंखे आणि निनाद महाडिक हे दोघे फरार असून, त्यांना पकडल्यानंतर या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यावर येत्या दोन ते तीन दिवसांत या गुन्ह्यामागील नेमके कारण आणि त्यात आणखी कोणाकोणाचा हात होता, हे समजू शकणार आहे. आतापर्यंतच्या तपासाची सुई राणा सूर्यवंशी यांच्या दिशेने जात आहे.
उद्योगपती आणि राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. भिगवण), पार्थ वासुदेव अवथडे (वय १९, रा. कर्वेनगर), स्वप्नील भगवान कांबळे आणि चैतन्य उत्तम बाबर या चार जणांना अटक केली आहे. एका अल्पवयीन हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय ज्ञानेश्वर साळुंखे आणि निनाद महाडिक हे संशयित फरार आहेत.
राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर हल्ला करणाऱ्या पार्थ अवथडे आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी कर्वेनगरमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत राणा यांचा चालक ज्ञानदेव शिंदे याचे नाव समोर आले. पोलिसांनी शिंदे याला अटक केली. त्याने या दोघांना दोन लाख रुपये दिल्याचे तपासात उघड झाले. शिंदे याने पैसे पुरविले असले, तरी हल्ला करण्याबाबतची माहिती सत्तूर, गाडी, कांबळे आणि महाडिक यांच्याकडून मिळाल्याचे हल्लेखोरांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी स्वप्नील कांबळे याला अटक केली आहे.
प्रत्यक्षात सुपारी देण्याचे काम चैतन्य बाबर (रा. भिगवण) आणि ज्ञानदेव साळुंखे (रा. भिगवण) यांनी केल्याचे तपासात समोर आले आहे. हे दोघेही हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चैतन्य बाबर याला पकडल्यानंतर त्याने साळुंखे याचे नाव पुढे केले. या संपूर्ण प्रकरणात कांबळे याला दोन लाख, महाडिक याला दोन लाख आणि हल्लेखोर पार्थ व अल्पवयीन मुलाला दोन लाख रुपये, असे किमान सहा लाख रुपये दिले गेल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.
राणा सूर्यवंशी यांना पुणे ग्रामीणसह गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील पोलिसांचे संरक्षण होते. सूर्यवंशी यांना अनेक वर्षांपासून वाय-प्लस (अवर्गीकृत) संरक्षण पुरविण्यात येते. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून चालक आणि दोन पोलीस अंमलदार अशी सुरक्षा व्यवस्था राणा यांना पुरविण्यात येते. हल्ला झाला, त्यावेळी राणा सूर्यवंशी यांनी पोलिसांना, ‘तुम्ही पुढच्या गाडीत बसा,’ असे सांगितले होते. या सर्व पोलिसांचे जबाब ग्रामीण पोलिसांनी नोंदवले आहेत.
या प्रकरणात रोहित तुपे आणि विशाल धुमाळ हे पोलिसांच्या रडारवर आहेत. ते यापैकी कोणाकोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. राणा सूर्यवंशी यांनी आपल्याला व्हीआयपींसारखा बंदोबस्त मिळावा, यासाठीच हा हल्ला घडवून आणला का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
राणांवरील गोळीबाराबाबतही संशय
या घटनेच्या फिर्यादीत गोळीबार झाल्याचा फट असा आवाज ऐकल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावर असलेल्या काही जणांनी गोळीबार झाल्याचे सांगितले, तर तेथे संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी गोळीबाराचा आवाज ऐकला नसल्याचे जबाबात सांगितले आहे. पोलिसांना घटनास्थळी हल्लेखोरांचे पिस्तूल म्हणून एक पिस्तूल देण्यात आले आहे. तसेच सत्तूरही घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या चोहोबाजूंनी तपासणी केली; मात्र त्यात एकही पुंगळी आढळून आली नाही. हल्लेखोरांनी हे आपले पिस्तूल नसल्याचे सांगत गोळीबार केला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गोळीबाराबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलिसांकडे हल्लेखोरांचे पिस्तूल म्हणून जमा करण्यात आलेले पिस्तूल बॅलेस्टिक तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. या पिस्तुलातून गोळीबार झाला की नाही, याची तपासणी करून तज्ज्ञ अहवाल देतील. त्यानंतरच गोळीबार झाला होता की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
