जितो पुणे चॅप्टरतर्फे ‘रु-ब-रु’ प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जितो पुणे चॅप्टरच्या लेडीज विंगतर्फे महिलांच्या उद्योजकतेला, व्यवसायवृद्धीला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रु-ब-रु’ प्रदर्शनाचे आयोजन 3D Destination, मुकुंदनगर, पुणे येथे २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले.
या प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध क्षेत्रांतील मोठ्या संख्येने व्यावसायिक व स्टॉलधारकांनी सहभाग घेतला.
महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांची व सेवांची थेट ग्राहकांपर्यंत ओळख करून देण्यासाठी, तसेच नवीन व्यावसायिक संधी, नेटवर्किंग आणि ग्राहकवर्ग वाढविण्यासाठी ‘रु-ब-रु’ हे प्रदर्शन एक प्रभावी व्यासपीठ ठरले.
विविध प्रकारच्या वस्तू, फॅशन, लाइफस्टाइल, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी साहित्य, हस्तकला, सेवा व इतर व्यावसायिक उत्पादनांचे स्टॉल्स हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
या उपक्रमासाठी जितो पुणे लेडीज विंगच्या अध्यक्षा लतिका साकला, संयुक्त सचिव अर्चना कोचर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.
नियोजन, स्टॉल व्यवस्थापन, सहभागी व्यावसायिकांशी समन्वय आणि प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी टीमने उल्लेखनीय योगदान दिले.
या उपक्रमाला जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष मनोज छाजेड, मुख्य सचिव जिनेंद्र लोढा, लेडीज विंगचे डायरेक्टर इनचार्ज आदेश खिंवसरा यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
प्रदर्शनाला जितोच्या अनेक मान्यवरांनी भेट देऊन सहभागी उद्योजकांचा उत्साह वाढविला. यावेळी इंदर जैन, राजेश साकला, रविंद्र साकला, वस्तुपाल रांका, मनोज बोकडिया, मंगेश कटारिया, प्रकाश ओसवाल, सुजित भटेवरा, दिनेश ओसवाल, करण जैन, उमेश बोरा आणि मुकेश छाजेड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच लेडीज विंगच्या अॅडव्हायजरी बोर्डच्या रंजना साकला, प्रियांका परमार, खुशाली चोरडिया, लकीशा मार्लेचा, पूनम ओसवाल आणि एकता भन्साली यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन महिला उद्योजिकांना प्रोत्साहन दिले.
महिलांमधील उद्योजकतेला चालना देणे, त्यांना व्यवसायासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ‘महिला ते महिला’ व्यावसायिक नेटवर्क अधिक सक्षम करणे हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता.
‘रु-ब-रु’ प्रदर्शनामुळे महिला उद्योजिकांना आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी, तसेच नव्या ग्राहकांशी आणि व्यावसायिकांशी जोडले जाण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली.
जितो पुणे चॅप्टरच्या वतीने भविष्यातही महिला उद्योजकता, व्यवसायवृद्धी आणि समाजातील महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मनोज छाजेड यांनी सांगितले. – मनोज छाजेड, चेयरमैन, जितो पुणे चॅप्टर फाउंडेशन
