अत्याचार करून फरार झालेला नराधम तब्बल २० वर्षांनी जाळ्यात
येरवडा पोलिसांची कामगिरी : परळीहून घेतले ताब्यात, दर १५ दिवसांनी बदलत होता गाव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा येथील महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीने तब्बल २० वर्षे पोलिसांना गुंगारा दिला. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध भागांत त्याचा शोध घेण्यासाठी फिरणाऱ्या पोलिसांना अखेर परळीमध्ये तो सापडला.
नझीर मुस्तफा खान (वय ४६, सध्या रा. राजगल्ली, आयेशा कॉलनी, परळी, जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे. नझीर खान याच्यावर २००६ मध्ये येरवडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.
तेव्हापासून तो फरार होता. न्यायालयाकडून आरोपी फरार असल्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यापूर्वी अनेकदा आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, तो सापडला नव्हता.
गेल्या काही महिन्यांपासून येरवडा पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेण्याची मोहीम पुन्हा सुरू केली. त्यात नझीर खान हा जालना जिल्ह्यातील अंबड येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस अंमलदार संदीप जायभाय व सोमनाथ गायकवाड हे अंबड येथे रवाना झाले. तेथे शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही.
त्यानंतर आरोपीचा शोध सुरू ठेवण्यात आला. तेव्हा तो परळी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आयेशा कॉलनीमध्ये सापळा रचला.
काही दिवस त्याच्यावर पाळत ठेवून तोच आरोपी असल्याची खात्री केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नझीर खान हाच असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला परळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे कायदेशीर कारवाई करून त्याला येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, सहायक पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक शारदा कोकाटे आणि केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, किशोर बरड, पोलीस अंमलदार विनोद कायगुडे, मुकुंद कोकणे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार आणि संदीप धादवड यांनी केली.
गाव आणि काम बदलत होता फिरत – नझीर खान हा पुण्यातील सय्यदनगर, त्यानंतर हडपसर व लोहगाव येथे राहत होता. जालना जिल्ह्यातील अंबड, बीड जिल्ह्यातील परळी व माजलगाव, तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड अशा अनेक ठिकाणी तो पत्ता बदलून आणि वारंवार मोबाईल क्रमांक बदलून राहत होता. त्याने त्याचे भाऊ व इतर नातेवाईक यांच्याशी कोणताही संपर्क ठेवला नव्हता. मिळेल तिथे तो दोन-तीन दिवस गवंडी काम करून त्यानंतर कामाचे ठिकाणही बदलत असे. विशेष म्हणजे, तो इतक्या सातत्याने गाव आणि काम बदलत असला, तरी त्याच्या दोन ते तीन बायका असल्याचे सांगण्यात येते. इतर कोणाशीही संपर्क ठेवत नसल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. तो एखाद्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचेपर्यंत त्याने ते गाव सोडून दुसरीकडे स्थलांतर केलेले असे. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागत होते.
