छळाला कंटाळून विवाहितेने संपवले आपले जीवन
मुकुंदनगरमधील घटना : हुंडाबळीचा प्रकार, पती अक्षय झांबरे याला अटक, ४ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले. स्वारगेट पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.
पायल अक्षय झांबरे (वय ३४, रा. मंगलमय इमारत, झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ऋषिकेश रवींद्र पवार (वय ३१, रा. श्रीरामनगर, खेड शिवापूर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वारगेट पोलिसांनी तिचा पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३८, रा. झांबरे पॅलेस, मुकुंदनगर) याला अटक केली आहे. सासू मंगल अरविंद झांबरे (वय ५८), सासरे अरविंद झांबरे (वय ६५) आणि नणंद अक्षता अरविंद झांबरे-निम्हण (वय ३०, सर्व रा. मंगलमय, झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल हिचा विवाह अक्षय झांबरे याच्याशी १३ मार्च २०१९ रोजी झाला होता. विवाहात हुंड्यापोटी ५० तोळे सोन्याचे दागिने, २५ लाख रुपये तसेच विवाहाचा सर्व खर्च असा एकूण ७५ ते ८० लाख रुपये खर्च करण्यात आला होता.
विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून तिचा छळ सुरू केला.
घरकाम करण्यावरूनही तिला त्रास दिला जात होता. तसेच तिला खर्चासाठी पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे तिच्या खर्चासाठी माहेरून पैसे दिले जात होते.
तिने पती अक्षय याच्याकडे पैसे मागितल्यास तो तिला, ‘तुझ्या खर्चासाठी तू स्वतः पैसे कमव. नोकरी कर आणि स्वतःचा खर्च स्वतः भागव,’ असे सांगत असे.
२०२२ मध्ये पायल गर्भवती असताना तिची सासू मंगल, सासरे अरविंद आणि पती अक्षय हे तिला सतत मानसिक त्रास देत होते. ‘आम्हाला मुलगाच हवा आहे.
तुला मुलगाच झाला पाहिजे. आमची समाजात प्रतिष्ठा आहे,’ असे ते सांगत होते. पायल हिला मुलगी झाल्याचे समजल्यानंतर तिचे सासू, सासरे आणि पती यांनी रुग्णालयात येऊन तिच्याशी वाद घातला.
‘आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी कशी झाली? आम्ही या मुलीला आणि तुलाही सांभाळणार नाही,’ असे सांगून ते रुग्णालयातून निघून गेले.
त्यावेळी पायलची सिझेरियन प्रसूती झाल्याने रुग्णालयातील औषधोपचाराचा अंदाजे अडीच लाख रुपयांचा खर्च तिच्या माहेरच्यांनी केला होता.
पायलला मुलगी झाल्यानंतर एक वर्ष झाले, तरी तिचे सासरचे लोक तिला घेण्यासाठी आले नाहीत. अक्षय आणि सासू मंगल यांना विचारणा केली असता, ‘आम्हाला मुलगा पाहिजे होता. तुला मुलगी झाली आहे.
त्यामुळे तुम्ही दोघी इकडेच राहा. पुण्याला यायचे नाही, तिकडेच माहेरी राहायचे,’ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर झांबरे पॅलेस येथे अनेक बैठका घेऊन समजूत काढल्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आले.
मुलगी झाल्यामुळे तिला शिवीगाळ केली जात होती. ‘तुला आम्ही एवढे बोलतो, याची लाज वाटत नाही का? आम्ही सांगितलेल्या वस्तू अथवा पैसे आणणे जमत नसेल, तर आपला दुसरा फ्लॅट आहे, तिकडे जा. तिथे दोरी आहे.
नाहीतर तुझी ओढणी घेऊन तू आणि तुझी मुलगी फॅनला लटकत का नाही?’ असे बोलून तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता. पायल माहेरी आल्यावर हा सर्व प्रकार सांगत असे.
पुण्यात असताना घरी कोणी नसल्यास ती आईला फोन करून आपल्यावर होणाऱ्या छळाची माहिती देत होती. पायल पुण्याला आल्यानंतर तिची सासू आणि पती अक्षय तिला, ‘तुझ्या घरच्यांनी मुलीच्या सांभाळाचा खर्च देतो, असे सांगितले होते; परंतु त्यांनी काहीच खर्च दिला नाही.
त्यामुळे तू तुझ्या वडिलांकडून तुझ्या हिश्शाची जमीन मागून घे आणि माझ्या मुलाच्या नावावर कर. यातील काहीच जमत नसेल, तर माझा मुलगा अक्षय याच्यापासून घटस्फोट घे आणि तुझ्या मुलीला घेऊन आमच्या घरातून माहेरी निघून जा,’ असे सांगत होते.
ऑगस्ट २०२६ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पुन्हा दोन्ही घरांतील लोकांची बैठक झाली. त्यात पायलची मुलगी आध्या हिच्या शिक्षणाचा तसेच लग्नाचा सर्व खर्च आम्ही करू, तिला घटस्फोट देऊ नका, असे ठरले होते.
त्यानंतर पायलच्या सासरचे लोक तिला घरी घेऊन जाण्यास तयार झाले. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पायलचा भाऊ ऋषिकेश याला मुलगी पाहण्यासाठी बारामतीला जायचे असल्याने पायल सकाळी माहेरी आली होती.
पायल दिवसभर शांत होती. ती कोणाशीही काही बोलली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी तिला सायंकाळी विचारले की, ‘तू आज एवढी शांत का आहेस? काय झाले आहे का?’ त्यावर ती मोठ्याने रडू लागली.
तिने सांगितले की, ‘ते मला आणि आध्याला खूप त्रास देतात. सासू येता-जाता शिवीगाळ करून मारहाण करते. सासरे दारू पिऊन आले की गलिच्छ शिवीगाळ करतात. मला आता हे सहन होत नाही.’
त्यावर ऋषिकेश यांनी तिला, ‘तू पुण्याला जाऊ नकोस. दोन दिवस इथेच राहा,’ असे सांगितले. मात्र, पायल म्हणाली की, ‘आध्या पुण्यातच आहे.
तिची शाळा झाल्यानंतर मी तिला घेऊन उद्या येईन.’ असे सांगून पायलने पुन्हा सांगितले की, तिचे सासू आणि सासरे यांनी २०२६ च्या दिवाळीत पाच तोळे सोने घेऊन येण्यास सांगितले आहे.
ही बाब तिने त्यावेळी आपल्या भावाला सांगितली. सायंकाळी पायल कॅब करून खेड शिवापूरहून पुण्याला गेली, ती कायमचीच.
त्या दिवशी नेमके काय घडले? – प्रवासादरम्यान तिने एकही फोन किंवा मेसेज केला नाही. त्यानंतर रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी तिचा एक टेक्स्ट मेसेज आला. त्यात ‘माझी सासू जबाबदार आहे,’ असे लिहिले होते.
हा मेसेज वाचताच फिर्यादी यांनी पायलला फोन केला. मात्र, तिने फोन उचलला नाही. त्यामुळे तिचा पती अक्षय याला फोन केला असता, त्याने सांगितले की, ‘माझी आई आणि पायल यांचे भांडण सुरू आहे.
तू आमच्यात पडू नकोस. आमचे आम्ही पाहून घेऊ. आमच्या घरातील प्रत्येक गोष्टीत तोंड घालू नकोस,’ असे बोलून त्याने शिवीगाळ केली आणि रागाने फोन कट केला.
हा प्रकार त्याने आईला सांगितल्यानंतर तिनेही फोन केला; मात्र, कोणीही फोन उचलला नाही. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता फिर्यादी यांच्या आईने पायलचा पती अक्षय याला फोन केला असता, त्याचा फोन बंद होता.
त्यामुळे त्यांनी मेसेज करून पायल कुठे आहे, अशी विचारणा केली. मात्र, मेसेजला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी ७ वाजता अक्षयचा पायलच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन आला.
पायल घरी आली नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सर्वजण पुण्याला आले. त्यांनी पायल कुठे आहे, अशी विचारणा केली असता सासरे म्हणाले की, ‘आम्हाला माहीत नाही ती कुठे गेली आहे.
असेल कुठेतरी.’ त्यावर अक्षय म्हणाला की, ‘समोरच्या फ्लॅटमध्ये असेल बहुतेक.’ असे म्हणताच फिर्यादी धावत समोरच्या फ्लॅटकडे गेले.
दरवाजा बंद होता. त्यांनी मागील गॅलरीतील हॉलच्या दरवाजाची काच फोडून हॉलमध्ये प्रवेश केला आणि दरवाजा उघडला. पायलचे आई-वडील, चुलती आणि पती फ्लॅटमध्ये आले.
ते पायलचा शोध घेत किचनमध्ये गेले असता, ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. फिर्यादी यांनी तिला उचलून धरले; मात्र, तिची कोणतीही हालचाल दिसत नव्हती.
पायलला वाचविण्यासाठी तिचा भाऊ प्रयत्न करत असताना तिचा पती अक्षय तेथून निघून गेला. पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर पायलला खाली उतरवून रुग्णालयात नेले.
या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी झांबरे पॅलेसवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. स्वारगेट पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना शांत केले.
ऋषिकेश पवार यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ३(५), ३५१ तसेच हुंडाबंदी अधिनियम १९६१ मधील कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती अक्षय झांबरे याला अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करीत आहेत.
