राजगुरुनगरमध्ये महर्षी आनंद सेवा पुरस्कार सोहळा संपन्न
आरोग्य, मानवसेवा, प्रशासन व महिला सक्षमीकरण क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महर्षी आनंद सेवा पुरस्कार सोहळा राजगुरुनगर येथील जैन स्थानक सभागृहात प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. आदी संत-साध्वींच्या सान्निध्यात उत्साहात संपन्न झाला. आरोग्य सेवा, मानवसेवा, प्रशासन आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आपुलकी हॉस्पिटल, डॉ. संजय कोठारी, मनोज सेठिया आणि चैतन्य संस्थेला यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानची स्थापना २०१५ मध्ये प.पू. प्रशांतऋषीजी म.सा. यांच्या प्रेरणेने कासारवाडी येथे त्यांच्या चातुर्मासादरम्यान करण्यात आली.
धार्मिक व सामाजिक कार्य हा प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश असून, आतापर्यंत ३ हजारांहून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करून चष्मे वाटप, तसेच ३०० हून अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
शिक्षण, क्रीडा, धार्मिक, आरोग्य, साहित्य आणि मानवसेवा क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गेल्या सात वर्षांपासून प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांच्या दीक्षा दिनानिमित्त पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
यंदा महाराजांच्या ४६ व्या दीक्षा दिनानिमित्त राजगुरुनगर येथे चातुर्मास संपन्न होत असताना या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प.पू. प्रशांतऋषीजी म. सा. , प.पू. मधुस्मिताजी म.सा. व प.पू. विजय स्मिताजी म.सा. यांचे सान्निध्य लाभले.
आरोग्य सेवा क्षेत्रातील पुरस्कार आपुलकी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. प्रितेश मनोत यांनी स्वीकारला. हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या दरात कॅन्सरवरील उपचार उपलब्ध करून दिले जातात.
मानवसेवा पुरस्कार जामखेड येथील संजय कोठारी यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी ७,५०० हून अधिक अपघातग्रस्तांना मदत केली असून, गेल्या ४० वर्षांपासून अनाथ मुले, वृद्ध, निराधार महिला आणि विद्यार्थ्यांसाठी सेवाकार्य केले आहे.
स्वतःच्या रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवून उपचार मिळवून देण्याचे कार्य ते करतात. प्रशासन सेवा पुरस्कार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मनोज शेटिया यांना देण्यात आला.
कनिष्ठ अभियंता पदापासून शहर अभियंता पदापर्यंत पदोन्नती मिळवलेल्या शेटिया यांची उत्तम प्रशासक म्हणून ओळख आहे. महिला सक्षमीकरण पुरस्कार राजगुरुनगर येथील चैतन्य संस्थेला प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुधाताई कोठारी व रेखाजी शत्रिय यांनी पुरस्कार स्वीकारला. महिला बचत गट, उद्योगांना प्रोत्साहन आणि आर्थिक मदतीद्वारे संस्था महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कार्यरत आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, कार्याध्यक्ष संदीप फुलफगर, महामंत्री चंद्रशेखर लुंकड, कोषाध्यक्ष प्रणित बागमार, विश्वस्त विलासकुमार पगारिया, दिलीप भन्साळी, संदीप चोरडिया, वसंतलाल बोरा, राजगुरुनगर श्री संघाचे अध्यक्ष अजय बलदोटा, महामंत्री चंदन खारीवाल, माजी अध्यक्ष विजय भन्साळी, संतोष बोथरा, प्रदीप कासवा, प्रकाश गदिया, लालचंद कर्नावट, सुशील शिंगवी, सुनंदा भन्साळी, योगिता भन्साळी, अजित लुनावत व विपुल कर्नावट आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अशोककुमार पगारिया व अजय बलदोटा यांच्या हस्ते, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि श्री संघाच्या माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला पुरस्कारार्थींचे सहकारी, कार्यकर्ते, श्री संघाचे पदाधिकारी व श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चंदन खारीवाल व डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले, तर अजय बलदोटा यांनी आभार मानले.
