नाशिकमधून घेतले ताब्यात : न्यायालयाने सुनावली ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : टीईटी पेपर गैरव्यवहारात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी पेपर गैरव्यवहारमध्ये जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या दोघा मुख्य एजंटांना 350 परीक्षार्थींचे 3 कोटी 85 लाख रुपये देणाऱ्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे.
टीईटी पेपर गैरव्यवहार प्रकरणात 12 जणांना अटक केली असून तब्बल 4 कोटी 68 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सुरंजित गुलाब पाटील (वय-50 रा. उत्तमनगर, नाशिक), स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, स्वप्नील पाटील हा शिक्षक असून, सुरंजित पाटील टेक्निशियन आहे. त्यांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अंकुश हरकळ व संतोष हरकळ यांच्याशी संपर्क केला. त्यांनी 2018 आणि 2019 परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी कट रचला. सुरंजित पाटील याने 2019 च्या परीक्षेसाठी 200 परीक्षार्थीकडून प्रत्येकी 1 लाख 10 हजार रुपये घेऊन या परीक्षार्थीची यादी व 2 कोटी 35 लाख रुपये अंकुश आणि संतोष हरकळ यांना वेळोवेळी दिल्याची कबुली दिली आहे.
150 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 1.10 लाख
स्पप्नील पाटील याने 2019 च्या परीक्षेला बसलेल्या 150 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 1 लाख 10 हजार रुपये घेऊन त्यांची यादी व 1 कोटी 50 लाख रुपये अंकुश आणि संतोष हरकरळ यांना दिली. त्यांना या परीक्षा गैरव्यवहारत किती रक्कम मिळाली याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील जाधव यांनी न्यायालयात सांगितले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, अनिल डफळ, सचिन वाजे, नितेश शेलार, रवींद्र साळवे, नितीन चांदणे,सोनुने, अश्विन कुमकर यांच्या पथकाने केली.
