टीईटी आणि शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार : राजकीय आणि सिनेमा क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांसह राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत आहे. राजकीय क्षेत्रात, सिनेक्षेत्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यातच आता टीईटी आणि शिक्षक पात्रता भरती परीक्षा गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेल्या तुकाराम सुपे, शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचं समोर आलं आहे. त्याबरोबर सायबरच्या पोलीस उपायुक्तांसह ११ अधिकारी- कर्मचाऱ्यांनादेखील कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आता आरोपींना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यातच त्यांच्या संपर्कात येणा-या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सायबर पोलिसांची चिंता वाढली आहे. पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह 11 अधिकारी तसेच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
दरम्यान, सायबर पोलिसांकडून न्यायालयाला एक विनंती करण्यात आली आहे की, ‘आरोपींच्या संपर्कात राहून तपास करणे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट यांचे पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून तूर्तास तरी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर व्हावा, असं सांगण्यात आलं आहे.
