५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग: बुद्धिमत्ता व रणनिती कौशल्यांचा उत्कृष्ट प्रत्यय
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त नॅशनल स्कूल, सूर्यदत्त फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमी आणि पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल (पीडीसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी आंतरशालेय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
शालेय स्तरावरील या भव्य स्पर्धेत विविध ८० नामांकित शाळांमधील ७, १०, १५ व २० वर्षांखालील अशा चार गटात ५०० पेक्षा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि रणनिती कौशल्यांचे दर्शन घडले.
एक लाखाहून अधिक रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रांचे यावेळी वितरण करण्यात आले. सात वर्षांखालील गटात समर कोरे, विहान कांबळे, अनिरुद्ध नगरकर, ऋणवी रणदिवे, कशिव चाकवे, १० वर्षांखालील गटात सर्वज्ञ बालगुडे, राजवीर दिवे, अर्जुन कौलगुड, हेयान रेड्डी, शौर्यराज बगाडे, १५ वर्षांखालील गटात अविरत चौहान, कवीन मथियाझागन, लथिक राम, श्रेयस सरदेशमुख, रेयांश झाड, तर २० वर्षांखालील गटात अर्णव कदम, ओजस देवशतवार, कुशाग्र जैन, अक्षय जोगळेकर व मिहीर सरवदे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकवला.
उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पालकांनी संपूर्ण दिवस मुलांसोबत घालवला. मुलांना प्रोत्साहन दिले.
मुलांबरोबर आलेल्या पालकांचीही उत्तम सोय करण्यात आली होती. त्याबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र चेस सर्कलचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे, फिडे इंटरनॅशनल ट्रेनर जयंत गोखले व फिडे मास्टर गौरव आणि फिडे ट्रेनर जयसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.
सर्व मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रसंगी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आव्हानांना सामोरे जाण्याचे, खंबीर राहण्याचे आणि निष्ठा व आत्मविश्वासाने आपल्या कौशल्यांना अधिकाधिक सक्षम करण्याचे आवाहन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
सामना हरणे किंवा जिंकणे हे महत्वाचे नाही, तर आपल्याला मिळालेल्या संधीतून नव्या गोष्टी शिकणे अधिक महत्वाचे असते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता वाढवण्यासह त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. युवापिढीला मोबाइलपासून दूर ठेवत वाचन, लेखन, विचार आणि शारीरिक तंदुरुस्ती याकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांना क्रीडा व कौशल्यांचा विकास साधता यावा, यासाठी सूर्यदत्त संस्था नेहमीच अशा नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देते. त्यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक तंदुरुस्तीला, ध्येयासक्ती आणि शिस्तीला चालना मिळते. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन



















