वास्तू इम्पीरियल विंग A मधील २९ गृहखरेदीदारांना दिलासा : व्याजासह परतावा देण्याचे आदेश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डिसेंबर २०२४ मध्ये बांधकाम पूर्ण करून ताबा देण्याचे आश्वासन दिले असतानाही वर्ष होत आले, तरी बांधकाम पूर्ण न करणाऱ्या ट्विन स्टार इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला महारेराने दणका दिला आहे. गृहखरेदीदारांना विलंब व्याजासह ताबा देण्याचे तसेच लागू असल्यास व्याजासह परतावा देण्याचा आदेश दिला आहे. महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी हा आदेश दिला आहे.
ट्विन स्टार इन्फ्रास्ट्रक्चर या प्रवर्तक कंपनीने रावेत येथे ‘वास्तू इम्पीरियल’ हा गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला होता. त्यात अगोदर गृहखरेदीदारांना डिसेंबर २०२३ मध्ये घरांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर ही मुदत वाढवून डिसेंबर २०२४ पर्यंत बांधकाम पूर्ण करून ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून नागरिकांनी फ्लॅट बुक केले आणि मागणीप्रमाणे कर्ज काढून मोठी रक्कम दिली.
असे असताना आता २०२५ साल संपत आले, तरी ट्विन स्टार इन्फ्रास्ट्रक्चर यांनी घरांचा ताबा न दिल्याने, त्यांनी अॅड. निखिल एस. पाचोरकर यांच्या मार्फत महारेराकडे धाव घेतली. यावेळी कंपनीने बांधकामातील उशिराबद्दल कोविड-१९, मजुरांचा तुटवडा तसेच तक्रारदार आणि प्रकल्पातील इतर वाटपधारकांनी वेळेवर पैसे न दिल्याने प्रकल्पाच्या प्रगतीवर विपरीत परिणाम झाला, अशी कारणे पुढे केली.
मात्र, हा प्रकल्प आणि गृहखरेदीदारांबरोबरचे करार कोविड-१९ नंतर झाले असल्याने महारेराने ही कारणे फेटाळून लावली. महारेराने आपल्या आदेशात ताबा देण्यात झालेल्या विलंबाबद्दल गृहखरेदीदारांना ६० दिवसांत व्याजासह परतावा देण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच सर्व फ्लॅटधारकांना ३० जून २०२६ पर्यंत ताबा देणे आवश्यक असून, ताबा देण्यापूर्वी अग्निशमन दलाचा ‘ना हरकत प्रमाणपत्र’, युटिलिटी कनेक्शन व इतर आवश्यक कायदेशीर मंजुरी घेणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद आहे.
















