रुबी हॉल क्लिनिकमधील दोघेही लॅब टेक्निशियन : दुसऱ्यासोबत विवाह ठरल्याने केले कृत्य
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कामाच्या ठिकाणी प्रेम जुळले, पण समाजभेदामुळे नातेसंबंधाला विरोध. विवाह दुसऱ्यासोबत ठरल्याने प्रियकराने प्रेयसीचा गुदमरवून खून केला आणि स्वतःही रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात उघड झाली आहे.
दोघेही रुबी हॉल क्लिनिकमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होते. त्याने तिला दीड वर्षांपूर्वी प्रपोजही केले होते. परंतु, दुसऱ्या समाजाचा असल्याने घरच्यांच्या विरोधामुळे तिने नकार दिला होता. आता तिचा दुसऱ्या तरुणासोबत विवाह ठरला होता.
त्यामुळे शेवटचा भेटण्यासाठी आणि पत्रिका देण्यासाठी ती गुपचूप त्याच्या रूमवर गेली. त्याने तिच्या तोंडावर उशी ठेवून दाब दिला. त्यात श्वास गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तळेगाव दाभाडे येथे जाऊन रेल्वेखाली उडी मारून जीव दिला.
दिव्या निघोट (वय २२, रा. लोणीकंद) असे प्रेयसीचे नाव असून गणेश शाहूराव काळे (वय २७, रा. तुळजाई बिल्डिंग, संगमवाडी, येरवडा; मूळ रा. अशोकनगर, ढगे कॉलनी, बीड) असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे.
दिव्या निघोट हिचे शवविच्छेदन करण्यात आले. श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. गणेशने तिच्या तोंडावर उशी दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत दिव्याचे वडील संतोष ज्ञानेश्वर निघोट (वय ४९, रा. वढू खुर्द, फुलगाव, ता. हवेली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष निघोट हे येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून नोकरीला आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा मूळचा बीडमधील आहे. तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरीला होता. दिव्या हीसुद्धा रुबी हॉल क्लिनिकमध्ये ३ वर्षांपासून लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करत होती.
गणेश काळे हा दिव्याचा सिनिअर होता. एकत्र काम करत असताना दोघांचे सुर जुळले. सुमारे दीड वर्षांपूर्वी गणेश काळे याने दिव्याला प्रपोज केले होते. तिने ही बाब आपल्या घरी सांगितली. काळे हा दुसऱ्या समाजाचा असल्याने घरच्यांनी व तिने त्याला नकार दिला होता.
त्यानंतर आता तिचा विवाह दुसऱ्या तरुणासोबत ठरविला होता. तिचा साखरपुडाही झाला होता. आणि तिचा विवाह १३ डिसेंबर रोजी होणार होता. दिव्या शनिवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी ६ वाजता कामाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली.
रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांनी चौकशी केली. तेव्हा तिच्या लहान बहिणीने ‘दिदीचा मेसेज आला असून कामावरून सुटल्यानंतर मैत्रिणीसोबत पिक्चर बघायला जाणार आहे’ असे सांगितले. रात्री ९ वाजेपर्यंत दिव्या घरी न आल्याने त्यांनी मैत्रिणीकडे चौकशी केली.
तेव्हा तिच्या मैत्रिणीने ती दोन दिवसांपासून आजारी असून दिव्याचा फोन आला नसल्याचे सांगितले. दिव्या लॅबमधून हाफ डे घेऊन सकाळी ११ वाजताच गेल्याचे समजले. कुटुंबीयांना पूर्वी प्रपोज करणार्या गणेश काळेवर संशय आला.
गणेश काळे याचाही मोबाईल बंद लागत होता. त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिव्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान, तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक परिसरात रविवारी सकाळी गणेश काळे याचा मृतदेह सापडला.
त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. गणेश काळे याची ओळख पटली. गणेशच्या मित्रांकडून हे समजल्यावर येरवडा पोलिसांना घेऊन त्यांनी गणेश काळे याच्या संगमवाडी येथील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरात दिव्या अंथरुणावर बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. तिच्या नाकावर, गालावर व इतर ठिकाणी मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. दिव्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दिव्या ही गणेशला आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आली असावी.
त्यावेळी त्याने तिच्या तोंडावर उशी दाबून श्वास कोंडून तिची हत्या केली व त्यानंतर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
















