आग आटोक्यात येत असताना आगीच्या ज्वाळांमुळे डीपीने घेतला पेट
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पिसोळी (ता. हवेली) दगडेवस्ती येथील प्लायवुडचे (२४ हजार चौरस फुट) गोदाम जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळांनी महावितरणच्या डीपीने पेट घेतला. पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेली आग सकाळी सहाच्या सुमारास आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आर्थिक नुकसान झालेल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिसोळीतील दगडे वस्ती येथे २४ हजार चौरस फूटचे गोडाऊन असून, गोडावूनमध्ये फ्लायवुडच्या थप्प्या लावल्या होत्या. चारही बाजूने लाकडी प्लायऊड असल्याने आगीने उग्र रूप धारण केले होते. आग लागलेल्या गोदामाच्या बाजूला आजूबाजूला इतर गोदामे असल्याने आग नियंत्रणात आणताना अग्निशामक दलाच्या जवानांची दमछाक झाली. शेजारी महावितरणचा हाय होल्टेजचा डीपी आहे. आगीच्या झळा त्या डीपीपर्यंत पोहोचल्या आणि काही क्षणातच डीपीनंही पेट घेतल्याचे समजताच पथकातील काही जवान तात्काळ डीपीची आग आटोक्यात आणण्यासाठी धावले. त्यांनी तातडीने डीपीला लागलेली आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
कात्रज, कोंढवा, हडपसर, मुख्य अग्निशामक केंद्र व पीएमआरडीच्या असे एकूण १४ अग्निशमनच्या गाड्या आणि टँकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इतर गोडाऊनला आग लागू नये, म्हणून अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, प्लायवूडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग नियंत्रणात आली असून, कुलिंगचे काम सुरू होते. आगीचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी कोंढवा पोलीस व गोडाऊनचे व्यवस्थापक अरिफ शेख, मच्छिंद्र दगडे उपस्थित होते. गोडावूनला आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच गर्दी हटविल्यामुळे अग्निशमनच्या जवानांना आग आटोक्यात आणता आली.
