खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दाखवला हिरवा झेंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाचा आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जलरथाचा प्रारंभ करण्यात आला.
ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढवा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शास्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा – 2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजना विषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथाचे आयोजन केले आहे.
यावेळी, जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख, जि. प. जिल्हा समन्वयक हनुमंत गादगे, तसेच सर्व कर्मचारी जिल्हा पाणी व स्वच्छ्ता मिशन जि. प. धाराशिव जिल्हा समन्वयक योगेश गाडेकर व सर्व तालुका समन्वयक व भारतीय जैन संघटना पदाधिकारी कांचनमाला संगवे, बीजेएस जिल्हाध्यक्ष जयकुमार जैन, डॉ. सचिन रामढवे, बीजेएस महिला अध्यक्ष किरण देशमाने, शांतीलाल कोचेटा, सागर दुरुगकर, अक्षय गांधी, सुनील डुंगरवाल, अरविंद देवसाळे, संतोष जैन, गुलचंद व्यवहारे, जयघोष जैन, संजय देवडा, हर्षद अंबूरे, अनिल डुंगरवाल,हे उपस्थित होते.
या जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स ऐकवल्या जाणार असून गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहे.
ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत तसेच नियुक्त केलेल्या समन्वयका मार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यात येईल.
भारतीय जैन संघटना या कार्यासाठी तंत्रज्ञानाची मदत व व डिमांड जनरेशनसाठी गावो गावी जाऊन शेतकरी बांधवापर्यंत पोहोचून जनजागृती करणार आहे.















