रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वाटप आणि रक्तदान शिबीर
महाराष्ट्र जैन वार्ता: अभिजित डुंगरवाल
पुणे : गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आर. एम. डी. फाऊंडेशनच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबवली जात असून गेल्या 18 वर्षापासून आजवर १२ हजार पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे अशी माहिती फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी दिली.
रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले.
त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, रसिकशेठ यांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही व अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले परंतु आपल्या स्वकर्तृत्वाने आणि कठीण परिस्थितीतूनही कष्टाने उद्योगाच्या उच्च शिखरावर ते विराजमान झाले आणि उद्योगजगतात अजरामर झाले. सामाजिक कार्यातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी भारतभर उमटवला.
आपल्या वडिलांची सामाजिक कार्यपरंपरा सतत कार्यरत राहण्यासाठी ते नेहमी प्रेरित व प्रवृत्त करतात त्यांच्याच आशीर्वादाने आज भारतभर अनेक सामाजिक उपक्रम सर्वसामान्य लोकांसाठी राबविण्यात येतात व पुढेही नवनिर्माण योजना राबविल्या जातील अशी भावना फाऊंडेशन द्वारा आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी व्यक्त केली.
यावेळी बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात नशेच्या आहारी जाऊ नये तसेच आपण निवडलेल्या अभ्यासक्रमातून देशसेवा करावी असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुभेच्छा देण्यासाठी सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर यांनी यावेळी आवर्जून हजेरी लावली व रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.
सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपा अधिकारी, उदयोग जगतातील मान्यवर, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, वृत्तप्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस अधिकारी, इत्यादी रक्तदाते रक्तदानास आले होते.
यावेळी 425 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे शोभा धारीवाल यांनी आभार मानले.
