वाहतूक पोलिसांकडून मोटारसायकल चालकांवर २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास देणाऱ्या २ हजार ८२२ बुलेट व इतर मोटारसायकलींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. फेब्रुवारी महिनाभरात ही कारवाई करण्यात आली. या मोटारसायकल चालकांवर २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी २३ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बुलेट मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून फटाक्यासारखा आवाज करणारे सायलेन्सर लावून त्या चालवणाऱ्या तरुणांची संख्या शहरात वाढली होती. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. त्यामुळे अशा मोटारसायकलींवर वाहतूक शाखेबरोबरच पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
वाहतूक शाखेने फेब्रुवारी महिन्यात अशा ८७० बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करून त्यांचे नियमबाह्य सायलेन्सर काढून घेतले. हे सर्व सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात या सर्व ८७० सायलेन्सरवर बुलडोझर चालवून ते नष्ट करण्यात आले.
ट्रिपल सीट कारवाई : १ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत वाहतूक पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत ट्रिपल सीट जाणाऱ्या १५ हजार ९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यात वाहनचालकांवर एकूण १ कोटी ४८ लाख ९५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी ८८ लाख ५२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह कारवाई : होळी आणि धुलीवंदन या दोन दिवशी उत्सव साजरा करण्याच्या नादात अनेक तरुण-तरुणी मद्यपान करून वाहन चालवताना आढळले. वाहतूक शाखेने या दोन दिवशी विशेष मोहीम हाती घेतली होती. या दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एकूण ४५५ वाहनचालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. सर्व मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचा समुपदेशन कार्यक्रम ४ मार्च रोजी येरवडा येथील वाहतूक शाखेत घेण्यात आला. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी त्यांना मद्यपान करून वाहन चालविल्यास होणाऱ्या परिणामांची माहिती देऊन पुन्हा असे कृत्य करू नये, असे आवाहन केले.

















