पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तस्करीचा उधळला डाव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बँकॉकहून आलेल्या विमानाच्या बाथरूममध्ये लपवून ठेवलेला ७४ लाख ५० हजार रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा सीमाशुल्क विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या तपासणीदरम्यान करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून पुण्यात आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे (आयएक्स २४१) विमान पुढे देशांतर्गत सेवेसाठी वापरण्यात येणार होते. याच तांत्रिक बाबीचा फायदा घेत तस्करांनी अमली पदार्थ लपवून ठेवण्याचा डाव आखला होता.
विमानातील बाथरूममधील टिश्यू कॅबिनेटच्या फायबर भागाचे स्क्रू काढून त्यामागील पोकळीत दोन पिवळ्या रंगाची पाकिटे लपवण्यात आली होती. विमान पुणे विमानतळावर उतरल्यावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे सखोल तपासणी केली.
त्यावेळी बाथरूममधील लपवलेल्या जागेत दोन पाकिटे आढळून आली. या पाकिटांमध्ये व्हॅक्युम सीलबंद केलेली आठ लहान पाकिटे होती. त्यामध्ये उच्च प्रतीचा ७४५ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा सापडला.
ही कारवाई मंगळवारी, ३ मार्च रोजी पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ७४ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विमानाच्या पुढील देशांतर्गत प्रवासाचा फायदा घेऊन हा माल बाहेर काढण्याचा तस्करांचा डाव असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वेबसीरिजमध्ये दाखवल्याप्रमाणे तस्करी – बँकॉकहून आलेले विमान पुढे देशांतर्गत विमान प्रवासासाठी वापरले जाते. परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी होते; परंतु पुढे हेच विमान देशांतर्गत प्रवासासाठी वापरले जात असल्यास त्यातील प्रवाशांची उतरल्यानंतर तपासणी होत नाही. याचा गैरफायदा घेऊन परदेशातून प्रवासी अमली पदार्थ आणून विमानात दडवून ठेवतात. ते देशात आल्यावर उतरून जातात. नंतर त्यांचा साथीदार या विमानातून प्रवास करताना लपवलेला अमली पदार्थ ताब्यात घेऊन पुढील शहरात उतरतो. ‘तस्करी’ या वेबसीरिजमध्ये तस्कर तस्करीसाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करतात हे दाखवण्यात आले आहे. त्याच पद्धतीने बँकॉक–पुणे विमानात ड्रग तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याने तस्करांचा डाव फसला. या साखळीतील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा काम करत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
















