यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भोसरी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न प्रीतम प्रकाश महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रामार्फत आयोजित पदवीप्रदान समारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या समारंभात बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, इंग्रजी), एम.कॉम. आणि एमबीए या अभ्यासक्रमांत उत्तीर्ण झालेल्या एकूण २१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव व विद्यमान प्रशासकीय सल्लागार उत्तमराव जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया होते.
मंचावर शाहू शिक्षण संस्थेचे अजय साळुंखे, प्राचार्य डॉ. सदाशिव कांबळे, केंद्र समन्वयक प्रा. पांडुरंग भास्कर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
महापौर रवी लांडगे यांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दैनंदिन काम सांभाळत उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करावे लागेल. ही केवळ पदवी नसून भविष्यातील यशस्वी वाटचालीची सुरुवात आहे.
उत्तमराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचे आवाहन केले. दूरस्थ शिक्षण पद्धतीमुळे नोकरी, व्यवसाय करणारे तसेच विविध कारणांमुळे शिक्षण थांबलेले विद्यार्थीही आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
या अभ्यास केंद्राचा निकाल यंदा शंभर टक्के लागला असून हे केंद्र गेल्या अकरा वर्षांपासून महाविद्यालयात कार्यरत आहे. आजपर्यंत या केंद्रातून सुमारे २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांमध्ये पदवी प्राप्त केली आहे, अशी माहिती प्रास्ताविकात केंद्र समन्वयक प्रा. पांडुरंग भास्कर यांनी दिली.
तसेच प्राचार्य डॉ. सदाशिव कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सराफ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रेणु आगरवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सुधाकर बैसाणे, प्रा. सचिन पवार, प्रा. उमेश लांडगे, ग्रंथपाल सारिका बेलदोर, प्रा. राजेश कुंभार तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.















