शब्दसारथी’तर्फे आयोजित चर्चासत्रात महिलांचा सूर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील शक्य करण्याचे सामर्थ्य स्त्री मध्ये असते असे विचार विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी मांडले.
‘शब्दसारथी’तर्फे दिलखुलास या कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या चर्चासत्र आणि खुल्या संवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी आपले अनुभवविश्व उलगडले.
या मध्ये वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्कीन स्पेशालिस्ट डाॅ. हर्षिदा चंदवानिया, गटविकास अधिकारी वर्षा वाडेकर, जेसीबी चालवणाऱ्या आणि त्याचा समर्थपणे व्यवसाय करणाऱ्या सुनिता घाडगे, स्वाधार संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या नूतन मारणे, सी फूड स्पेशालिस्ट म्हणून व्यवसाय करणाऱ्या कोमल काळे, गो डिजिटल या फायनान्स कंपनीच्या संचालिका अपूर्वा पातोडेकर आदी विविध क्षेत्रातील महिला या चर्चेत सहभागी झाल्या होत्या.
या सर्व महिलांना शब्दसारथीच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला तरुण मुलींची उपस्थिती अधिक होती. या वेळी वस्ती भागामध्ये लहान मुलांसाठी काम करताना येत असलेल्या विविध धक्कादायक अशा अनुभवांचे कथन नूतन मारणे यांनी केले.
तर जेसीबी, पोकलंड यासारख्या पुरुषप्रधान व्यवसायात टिकून राहण्यासाठी किती जिद्दीने उभे राहावे लागते याविषयीचे अनुभव सुनिता घाडगे यांनी कथन केले. छोटासा व्यवसाय उभा करताना देखील स्त्रीला किती जिद्दीने उभे राहावे लागते याविषयी कोमल काळे यांनी सांगितले. तर समाजात स्त्रियांच्या संदर्भात येणारे अनेक अनुभव अपूर्वा यांनी कथन केले.
डाॅ, हर्षिदा चंदवानिया यांनी उपस्थित महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जिद्द आणि आत्मविश्वासाने पुढे आलात तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य स्त्री मध्येच असते असे प्रतिपादन वर्षा वाडेकर यांनी केले. या प्रसंगी गो डिजिटलचे संचालक राहुल शिंदे उपस्थित होते. शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी प्रास्ताविक केले.
अश्विनी सप्तर्षी यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. मनिषा पोतदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
