आंबेगाव पोलिसांनी तीन गुन्हे आणले उघडकीस, सव्वा लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु या दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ओमकार मारुती देडे (वय २१, रा. किरकटवाडी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. ओमकार देडे याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत हर्षल महेंद्र शहा (वय ३८, रा. लेकव्हिस्टा, जांभुळवाडी रोड) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शहा यांचे दत्तनगर येथील विंडसर काऊंटी येथे वेद फुड चितळे बंधु हे दुकान आहे. दुकान बंद असताना २५ व २६ जानेवारी २०२६ च्या रात्री चोरट्यांनी दुकानाच्या डाव्या बाजूचे शटर उचकटले. समोरील काच फोडून आत प्रवेश केला. दुकानामध्ये असलेली २६ हजार २५० रुपयांची रोकड चोरून नेली होती.
गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ओमकार देडे व त्याचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केलेल्या तपासात आंबेगावमधील दोन आणि विमानतळ परिसरातील एक असे तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून रिक्षा, मोटारसायकल व रोख रक्कम असा १ लाख २४ हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमल यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेश साठे, चेतन गोरे, हणंमत मासाळ, निलेश जमदाडे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे, शिवाजी पाटोळे यांनी केली आहे.
















