अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन उत्साहात
महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल
पुणे : स्त्रीची प्रतिमा बदलत आहे परंतु तिच्या पदरी नेहमी उपहासच आलेला आहे, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले.
स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स तर्फे आयोजित अखिल भारतीय पंधराव्या स्त्री साहित्य कला संमेलनाची सुरुवात भव्य दिव्य अशा सर्व धर्म समभाव अशा अनेकांतवादी तत्त्वाने ग्रंथ दिंडीने झाली. अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्वागताध्यक्ष आशा लुंकड, विशेष अतिथी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस उपस्थित होते. यावेळी ग्रंथ दिंडीचे पूजन ज्येष्ठ समाजसेविका बदामबाई बेदमुथा, संमेलन अध्यक्ष नीलम मानगावे व सर्व विविध वेशभूषेमध्ये आलेल्या महिलानी केले. ढोल लेझीम पथक, कलश पथकाने ग्रंथदिंडी संमेलन स्थळी आली. या ग्रंथ दिंडीमध्ये ज्ञानेश्वरी, आगम, बायबल, कुराण आदी ग्रंथांचा समावेश होता.
संमेलन अध्यक्ष नीलम माणगावे यांनी या संमेलनात महिलांच्या अनुषंगाने बोलत असताना साहित्य संमेलने स्त्रियांच्या आत्मजागृतीसाठी स्वत्व शोधण्यासाठी महत्त्वाची आहेत. महिला लिहीत आहेत परंतु अजूनही महिलांनी आपले जीवनातील अनुभव लिहिले पाहिजे.
अशी संमेलने महिलांच्या प्रतिभेला पंख देणारी ठरतात. बळ देणारी ठरतात, असे प्रतिपादन केले. या संमेलनाचे आयोजन स्वानंद महिला संस्था, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या माध्यमातून करण्यात आले. स्वानंदच्या संस्थापिका अध्यक्षा साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांनी प्रास्ताविक केले स्वानंद महिला संस्थेचे अध्यक्ष शोभा बंब यांनी संस्थेत चाललेल्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी स्वानंद विशेष पुरवणी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर संस्था पुरस्कार देण्यात आले. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते समाजमान्य कार्यक्षम संस्थाना गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये चिंचवड येथील जैन विद्या प्रसारक मंडळ, दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, आखिल भारतीय श्री वर्धमान जैन स्वाध्याय संघ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, गौतम स्मृती फाउंडेशन, नक्षत्राचे देणे काव्यमंच या संस्थांना गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन श्वेता राठोड व रेशमा भंडारी यांनी केले. पुढच्या सत्रामध्ये प्रकट मुलाखत घेण्यात आली. या प्रकट मुलाखतीमध्ये दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन दिव्यांग मुलांसाठी काम करत असलेल्या संस्थेचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन, रेश्मा मुसळे, परिणेकर लावणी सम्राज्ञी लोककला यांची रंगतदार मुलाखत ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी घेतली.
या साहित्य संमेलनात प्रमुखा अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारीवाल, उद्योजक नेमीचंद चोपडा, उद्योजिका दिना धारीवाल, उद्योजिका आशा कटारिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रा. अशोक पगारिया, रमणलाल लुंकड, अविनाश चोरडिया, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, भाऊसाहेब भोईर, डॉ. संजय चोरडिया, प्रफुल्ल रायसोनी, राजेंद्र सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. रंगतदार कवी संमेलन निमंत्रित कवींच्या संमेलनात हशा आणि टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे होते. उद्घाटक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. या कवी संमेलनासाठी अनिल दीक्षित, पितांबर लोहार, संपत गर्जे, दीपेश सुराणा, कल्पना बंब, वर्षा बालगोपाल, वंदना इनान्नी, राजश्री बिनायकीया, संगीता झिंझुर्के, सुलभा सत्तुरवार, माधुरी विधाटे, प्रा सुरेखा कटारिया, सीमा गांधी, डॉक्टर प्रियंका लूनावत यांनी आपल्या रचना सादर केल्या. याचे सूत्रसंचालन सीमा गांधी व डॉ. प्रियंका लुनावत त्यांनी केले.
यानंतर परिसंवादामध्ये सहभागी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, सामाजिक कार्यकर्त्या रुचिरा सुराणा, रवींद्र कटारिया यांनी या परिसंवादाचा विचारवेध घेतला.
याचे सूत्रसंचालन डॉ.अशोक पगारिया यांनी केले. स्त्री आजही सामाजिक, राजकीय, साहित्यिक, कौटुंबिक क्षेत्रात दुय्यम स्थानीच आहे का? या विषयावरील परिसंवाद अतिशय रंगला आणि यामध्ये दोन बाजूने सकारात्मक व नकारात्मक सुर बाहेर आले. भारतातून निवडलेल्या महिलांना स्वानंद भरारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
डॉ. श्रीपाल सबनीस व ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम पाटील, मनसुख गुगळे, रमणलाल लुंकड, राजेंद्र घावटे ,पंचम झोनचे अध्यक्ष सुनील बाफना यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. स्वानंद भरारी पुरस्कार आणि सावित्रीबाई महिला रत्न पुरस्कार देऊन आमदार उमा खापरे, समाज रत्न पुरस्कार प्रभा संघवी बालोतरा नगरपालिका नगराध्यक्षा, क्रियाशील समाज भूषण पुरस्कार ललिता ओस्तवाल, कर्तव्यदक्ष सर्वपल्ली डॉ.राधाकृष्ण पुरस्कार डॉ. शितल भंडारी, बहिणाबाई साहित्य भूषण पुरस्कार ज्योती कानेटकर, कार्यक्षम पत्रकारिता आशा साळवी, कृतीशील शेतकरी कमल सातपुते, कुसुम भंडारी- आदर्श माता मदर तेरेसा सेवा पुरस्कार, क्रीडाभूषण देशना नहार, संपादिका सुनंदा चोरडिया- स्वानंद भरारी सुजनशील संपादकीय सेवा पुरस्कार, डॉ. अंजली देशपांडे-आनंदीबाई जोशी वैद्यकीय सेवा, स्वाध्याय शिरोमणी वाणीभूषण प्रीती सुधाजीजी पुरस्कार- पुष्पाबाई छाजेड, वीर हुलसा माता पुरस्कार- बिजाबाई लुंकड, आदर्श माता मदर तेरेसा सेवा पुरस्कार इत्यादींचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सूत्रसंचालन शितल बाफना, प्रियंका बोरा यांनी केले.

 
			




















