महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. रात्रंदिवस कबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात, कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे.
शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.
मात्र असे असले तरी अनेकदा परंपरागत शेती करतांना कोणती नवीन बी बियाणे निवडावी, आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची, शेतमालाला योग्य बाजारभाव कसा मिळेल, शेतीबाबत पुढील आव्हाने कोणती, त्यावर काय उपाय योजना कराव्यात याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळण्याचा अभाव असतो, हीच बाब हेरून गरजेनुसार शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची निकड लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्याच ग्रामीण भागात सोलापूर जिल्यातील निमगांव, तालुका माढा येथे ऍग्रीकल्चर नॉलेज हब उभारण्यात येणार आहे अशी माहिती आर.एम.डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी माणिकचंद स्कायवन कल्याणी नगर पुणे येथे माढा वेल्फेअर फाऊंडेशन सोबत केलेल्या सामंजस्य करारावेळी दिली.
यावेळी आर एम डी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. एक कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या ऍग्रीकल्चर नॉलेज हब मध्ये एकाच वेळी ८०० ते १००० शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची, व्याख्यानाची, राहण्याची व शाकाहारी जेवणाची सोय असेल व प्रकल्प मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती जान्हवी धारीवाल बालन यांनी दिली.
