महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
मुंबई : सरहद पुणे , भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम संस्था पुणे यांच्या सहकार्याने सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेचे आयोजन ३० जून २०२४ रोजी झोजिला वाँर मेमोरियल ते कारगिल वाँर मेमोरियल या दरम्यान करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लोगो आणि संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या वतीने प्रथमच झोजिला युध्द विजय अमृत महोत्सव आणि कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्याथाँन-२०२४(मँरोथाँन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत भारतासह जगातील विविध देशातील धावपटू भाग घेणार आहेत. या स्पर्धेसाठी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गेली सहा वर्षे सरहदच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन यशस्वीपणे कारगिल येथे करण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय लष्कराने सरहद संस्थेला या स्पर्धेचे आयोजन करण्यास आमंत्रित केले आहे.
या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी ४४ किमी मँरोथाँन, २५ किमी मँरोथाँन, १० आणि ७.५ किमी आणि अंतराच्या स्पर्धा तसेच शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ४ किमी ची स्पर्धा घेतली जाईल आणि या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, स्पर्धेचे अर्हम संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य समन्वयक डॉ शैलेश पगारीया, स्पर्धा संचालक सुमंत वाईकर, तांत्रिक संचालक वसंत गोखले, सरहदचे सुयोग गुंदेचा, रामदास खोपडे, अजित निबांळकर, संतोष बालवडकर, स्वयंम पगारीया उपस्थित होते. www.sarhadkargilmarathon com या संकेत स्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक मेजर जनरल सचिन मलिक (लडाख मुख्यालय) हे आहेत.















