पोलिसांनी केले जेरबंद, युनिट-१ गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : मध्यप्रदेश येथील कुस्ती पैलवानास सख्या मेव्हण्याची सुपारी देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे. युनिट-१ गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे.
या प्रकरणी महेश ठोंबरे (वय २८ वर्ष रा. जुना बस स्टॉप संगमवाडी, सध्या आगरवाल तालीम, कसबा पेठ), फैजल खान, (रा. मध्यप्रदेश), अश्विनीकुमार पाटील (वय ५२ वर्ष रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटेरोड, शिवाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी आपले हॉटेल बंद करुन घरी आले असताना दोन व्यक्ती पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांच्या जवळ आले. काही कारण नसताना त्यांच्या तोंडावर लाल तिखट टाकुन कोणत्या तरी हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन त्यांचा खुनाचा प्रयत्न केला.
याबाबत डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिट १ कडील पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, निलेश साबळे यांनी गुन्हयाच्या घटनास्थळापासुन सीसीटीव्ही फुटेज पाहुन संशयीत आरोपी हे पुणे स्टेशन येथे गेल्याचे निष्पन्न झाले.
या सीसीटीव्ही फुटेज व्दारे गुन्हयाचा तपास करुन निष्पन्न झालेला आरोपी महेश ठोंबरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हयाचा तपास केला असता त्याने ५० हजार रुपायांची सुपारी घेऊन पैलवान फैजल खान व त्याचे दोन मित्र यांच्यासह गुन्हा केला असल्याचे कबुल केले. महेश ठोंबरे यांच्या सांगण्यावरुन फिर्यादीचे दाजी अश्विनीकुमार पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यास युनिट १ कार्यालयात आणुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हयांची कबुली दिली आहे. आरोपी महेश ठोंबरे (पैलवान), फैजल खान (पैलवान) यांनी अश्विनीकुमार पाटील यांच्या सांगण्यावरुन पुर्व नियोजीत कट रचुन गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या आरोपींना डेक्कन पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १, शब्बीर सय्यद सहायक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, शुभम देसाई, राहुल मखरे, आय्याज दड्डीकर यांनी केली आहे.
