अजमानमधील फार्महाऊस खुला करून निवास : भोजन व एअरपोर्ट पिक-अप-ड्रॉपची विनामूल्य सोय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दुबई आणि आसपासच्या विमानतळांवरील अनेक विमान उड्डाणे अचानक रद्द झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. राहण्याची सोय नसल्याने आणि पुढील प्रवासाचा मार्ग स्पष्ट नसल्याने अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. अशा वेळी दुबईतील प्रसिद्ध उद्योजक डॉ. धिरज कांतीलालजी जैन आणि डॉ. ममता धिरज जैन यांनी माणुसकीचे दर्शन घडवत मदतीचा हात पुढे केला आहे.
१ एक्स एल होल्डिंग्स (1XL Holdings) चे संस्थापक व अध्यक्ष तसेच जैनम जिविका फाउंडेशनचे संस्थापक डॉ. धिरज कांतीलालजी जैन यांनी अजमान येथील आपले खाजगी फार्महाऊस अडकलेल्या प्रवाशांसाठी विनामूल्य खुले केले आहे.
येथे प्रवाशांच्या राहण्यासाठी स्वच्छ आणि आरामदायक व्यवस्था करण्यात आली असून अन्न, पाणी, गाद्या, ब्लॅंकेट तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रवाशांना विमानतळावरून फार्महाऊसपर्यंत आणण्यासाठी आणि पुन्हा विमानतळावर पोहोचवण्यासाठी विनामूल्य पिक-अप व ड्रॉपची सोय देखील करण्यात आली आहे.
फार्महाऊसवर प्रवाशांच्या केवळ निवासाचीच नव्हे तर त्यांच्या आरोग्याची आणि आरामाचीही विशेष काळजी घेतली जात आहे. येथे तंबू उभारण्यात आले असून डॉक्टर, योगा प्रशिक्षक, इंटरनेट सुविधा, प्रोजेक्टर आणि स्क्रीन यांसारख्या आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यासोबतच दररोज सकाळी ‘नवकार मंत्र’ पठणामुळे परिसरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. गेल्या तीन दिवसांत २०० हून अधिक प्रवाशांना येथे निवारा मिळाला आहे.
अहमदाबादमधील ३० पर्यटकांचा एक गटही दुबईत अडकला होता.
हा गट तीन दिवस फार्महाऊसवर थांबला आणि पुढील प्रवासाची सोय झाल्यानंतर त्यांना निरोप देत सुरक्षितपणे भारतात रवाना करण्यात आले. या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. धिरज कांतीलालजी जैन म्हणाले की, “या संकटकाळात कोणताही प्रवासी उपाशी राहू नये आणि प्रत्येकाला सुरक्षित निवारा मिळावा, हीच आमची प्राथमिकता आहे.”
मदतीसाठी संपर्क –
व्हॉट्सअॅप / कॉल : +971 56 360 1234
जैनम जिविका फाउंडेशन हेल्पलाईन (भारत) : +91 95 5289 5289
ईमेल : info@JJFIndia.com
पत्ता : जैनम जिविका फार्म, हेलियो-२, अजमान, यूएई.

















