महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : गरजू रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णालयाला ‘जैन मुनी कुंदनऋषीजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, ही वडिलांची इच्छा होती. हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या निश्चय मुलाने केला आहे. संजय गादिया असे या आदर्श मुलाचे नाव.
कात्रज परिसरातील गुजर निंबाळकरवाडी या गावच्या हद्दीत हे अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाणार आहे. या संभाव्य रुग्णालयासाठी मोफत दीड एकर जमीन आणि २५ कोटी रुपयांची तजवीज केली आहे. या नियोजित रुग्णालयाला जैन मुनी महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज यांचे नाव दिले जाणार आहे.
रुग्णालयाच्या उभारणीसाठी मोहनलाल गादिया वैद्यकीय संशोधन विश्वस्त संस्थेची (मेडिकल रिसर्च ट्रस्ट) स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून हे रुग्णालय उभारले जाणार आहे. यानुसार तीन महिन्यांत हे काम सुरू करून, तीन वर्षांत हे रुग्णालय सुरू करण्याचा संजय गादिया, परेश गादिया यांचा संकल्प आहे.
पुण्यातील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोहनलाल गादिया यांचे हे स्वप्न होते ते जैन मुनी कुंदनऋषीजी महाराज यांचे शिष्य होते. त्यामुळे गरिबांची सेवेसाठी गुरूंच्या नावे समाजसेवी प्रकल्प उभारायचा आणि या प्रकल्पासाठी अन्य कोणाकडून देणगी किंवा वर्गणी न मागता स्वतःच्या संपत्तीतून या प्रकल्पाची उभारणी व्हावी, असे मोहनलाल गादिया यांचे स्वप्न होते.
वडिलांना आजारपणामुळे मृत्यूपूर्वी काही महिने खूप वेदना सहन कराव्या लागल्या. या वेदनांमुळे त्यांनी समाजाला उपयोगी ठरेल, असे अत्याधुनिक रुग्णालय स्वखर्चाने उभारण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, वडिलांचे निधन झाले. त्यामुळे वडिलांची इच्छापूर्तीसाठी हे रुग्णालय उभे केले. अशी भावना संजय गादिया यांनी व्यक्त केली.