कोथरुड पोलीसांची धाडसी कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : दरोडा टाकणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांना हत्यारासह जेरबंद करण्यात कोथरुड पोलीसांना यश आले आहे.
कालु झिनेगल (वय २० वर्षे रा. तिलकनगर, भिलवाडा राजस्थान), कन्हैयालाल कुमावत( वय १९ वर्षे रा. जोगनीया हॉटेल आझादचौक, भिलवाडा रेल्वे स्टेशनजवळ भिलवाडा राजस्थान), प्रिन्स खाटीक (चंदेल) (वय २० वर्षे, रा. दादाबाडी, भिलवाडा राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत.
घर, सर्व्हे नं.९९, १/२५, पाण्याच्या टाकीजवळ चांदणी चौक, कोथरुड येथे चोर चोरी करण्यासाठी आले आहेत असा नियंत्रण कक्षेला फोन आला. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, असे प्राप्त झालेल्या कॉलपॉईटच्या ठिकाणी तात्काळ पोहोचले.
या ठिकाणी तक्रारदार यांनी घरामध्ये हत्यारबंद व्यक्ती असून ते घरामध्ये दरोडा टाकत आहेत व काही व्यक्ती आजूबाजूस आहेत असे सांगितले. त्यावरून गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी स्वतःकडील हत्यारे लोड करून संपुर्ण घराला वेढा टाकला. तसेच घरामध्ये मागील बाजूने टेरेसवर चढून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग अत्यंत शिताफीने बंद केले.
त्यानंतर घराचा दरवाजा तोडून हत्यारबंद अधिकारी अंमलदार यांनी नियमबंध मुव्हमेंट करीत घरामधील एक एक रूम चेक करीत पुढे गेले. आरोपी हे घरातील बेडरूममधील बाथरूममध्ये लपल्याचे जाणवले. त्यावेळी पोलिसांनी बेडरूममध्ये जाऊन बाथरूमचा दरवाजा तोडला. बाथरूमध्ये लपून बसलेले तीन दरोडेखोरापैकी एका दरोडेखोराचे हातामध्ये लोंखडी कोयता, लोखंडी हातोडी व कटावणी अशी हत्यारे होती.
या दरोडेखोरांनी हातामधील हत्यारांसह पोलीसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु हत्यारबंद पोलीस पथकाने तिन्ही दरोडेखोर आरोपींना अत्यंत चलाखीने त्यांच्याकडील हत्यारांसह थरारकरित्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले.
त्याचवेळी पोलीस पथकामधील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पळून गेलेल्या आरोपींचा संपुर्ण भागात शोध घेतला, परंतु पळून गेलेले साथीदार आरोपी मिळून आले नाहीत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरोडेखोर आरोपींना अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग भिमराव टेळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड पोलीस ठाणे संदिप देशमाने, बालाजी सानप, रविंद्र आळेकर, बसवराज माळी यांनी केली आहे.
