भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये स्विकारणार नवीन पदभार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून २००३ ते २००७ या कार्यकाळात उत्कृष्ट आणि नियोजन पध्दतीने प्रशासकीय कामात सेवा बजावलेले आनंद भंडारी यांची राज्य शासन व केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांनी घेतलेल्या परीक्षा व मुलाखतीद्वारे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) निवड झाली आहे.
लवकरच आनंद भंडारी नवीन पदभार स्विकारणार आहेत. या निमित्ताने त्यांचे खेड तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह खेड पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे. भंडारी हे २०२१ पासून पुणे येथील साखर संकुल येथील राज्य शासनाच्या पंचायत राज विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. आयएएस म्हणून लोकसभेची आचारसंहिता संपताच आनंद भंडारी एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अथवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे.
ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, मृद व जलसंधारण, पर्यावरण रक्षण व संवर्धन, स्वच्छ भारत अभियान, प्रशिक्षण व क्षमता बांधणी, विविध विकास योजनांची अंमलबजावणी, शासनाच्या विविध अभियानांची अंमलबजावणी आदी क्षेत्रात भरीव काम केले. २०१८ साली ग्रामविकास विभागाचा ‘गुणवंत अधिकारी पुरस्कार’ देऊन राज्यपालांच्या हस्ते भंडारी यांना गौरविण्यात आले होते.
