महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे शहरातील शैक्षणिक वर्तुळात नावलौकिक प्राप्त केलेल्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राचार्य व प्राध्यापकांचा स्नेहमेळावा गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व मान्यवर यावेळी जुन्या आठवणीत रंगुन गेले होते.
द पूना गुजराती केळवणी मंडळाचे हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय यंदाच्या वर्षी माणिक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या अंतर्गत महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातील पहिले पुष्प गुरूवार, दि.१३ जून रोजी गुंफले गेले.
महाविद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीत आपले अमूल्य योगदान दिलेल्या सर्व माजी प्राचार्य आणि सेवानिवृत्त प्राध्यापकांचा स्नेहमेळावा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. स्नेहमेळाव्यास आवर्जून उपस्थित असणारे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मोहिते आणि डॉ. पठाडे यांनी माणिक महोत्सवी वर्ष आणि महाविद्यालयाच्या वाटचाली संदर्भात अनेक मौलिक सूचना केल्या.
माणिक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्याबाबत सुचविले. संस्थेचे विश्वस्त अनुजभाई गांधी यांनी आपल्या मनोगतात माणिक महोत्सवी वर्षाच्या मार्गदर्शना सोबतच संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याच्या ठराविक रविवारी वेगवगळ्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्याची शिफारस केली.
डॉ. ए. पी. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात माणिक महोत्सवी वर्षात कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. शिरोडे यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या ‘कल्याणी व्हील्स’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण) उपलब्ध करुन देण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे माजी उप-प्राचार्य डॉ. पंधारे, डॉ. गुजर, डॉ. अनिता साठे आणि प्राध्यापिका डॉ. विलीना इनामदार हेही मेळाव्यास आवर्जून उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यातील शिफारसी आणि निर्णयांनुसार महाविद्यालयात संपूर्ण वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी हमी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना दिली.
महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. नीता बोकील आणि डॉ. राजश्री पटवर्धन याप्रसंगी उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने सचिव हेमंतभाई मणियार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. डॉ. गुलाब गुगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
