महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : क्लास मधून घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग केला. तिला नर्सरीत घेऊन जाऊन तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला.
ही घटना लोणी काळभोर आणि अहमदनगर येथे एप्रिल 2023 ते जून 2024 या कालावधीत घडली आहे. याबाबत 16 वर्षाच्या पिडित मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय नामदेव नेटके (वय-26 रा. हिसरे, ता. करमाळा जि.अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लोणीकाळभोर पोलिसांनी दिली.
पीडित मुलगी क्लास मधून घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलीची दुचाकी रस्त्यात अडवून तिला जबरदस्तीने थेऊर येथील एका नर्सरीमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीला अहमदनगर येथील नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला.
त्याठिकाणी एका खोलीत मुलीला डांबून ठेवून तिला मारहाण केली. तसेच तिच्यासोबत असभ्य वर्तन करताना फोटो काढले. त्यानंतर आरोपीने त्याच्या भाची सोबत पीडित मुलीला चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून त्यावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
