हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाची लागण झाल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा खून केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी (दि. २६) हडपसर पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पोलिसाचाही समावेश आहे. जमीन लाटण्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या चार जणांमध्ये एक पोलिस कर्मचारी, रुग्णालय, मृताचा मुलगा आणि नातू यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २६ मे २०२१ रोजी घडल्याचे म्हटले आहे. त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
नारायण बापू तेलोरे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी गणेश विलास पोटे (३७, रा. मांजरी ग्रीन अॅनेक्स, हडपसर), विलास नारायण तेलोरे (५७), आकाश विकास तेलोरे (२८, दोघे रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, अहिल्यादेवीनगर) आणि शिवम हॉस्पिटल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मृताचा धाकटा मुलगा राजेंद्र नारायण तेलोरे (४५, रा. खळेवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
गणेश पोटे हा पोलिस कर्मचारी आहे. तर विलास आणि आकाश हे दोघे फिर्यादी यांचे चुलते व पुतणे आहेत. नारायण यांना सर्दी, खोकला तसेच कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. फिर्यादीचे वडील नारायण आणि अन्य तीन आरोपी यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती.
१४ मे २०२१ रोजी पोटे याने फिर्यादी यांना न सांगता नारायण यांना गावावरून मांजरी येथे आणले. त्यानंतर २६ मे २०२१ रोजी मध्यरात्री पोटे याने नारायण यांना पुण्यात आणले. शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याबाबत विचारणा केली असता फिर्यादी यांना उडवा उडवीची उत्तरे दिली.
आरोपींनी ‘वडिलांच्या मृत्यूबाबत जास्त वार्ता करू नको. नाहीतर तुझ्या बापाच्या किडन्या जशा गायब केल्या, तशा तुझ्या पण गायब करून तुला खपवून टाकेन’, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना तलवारीने, काठ्याने जबर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी राजेंद्र नारायण तेलोरे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाने या अर्जाची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे पोलीसांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक मंगल मोडवे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करत आहेत.