महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाच्या आणि दि पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे”, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा यांनी येथे केले.
रविवारी(७ जुलै) आयोजित केलेल्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव हेमंत माणियार, सहसचिव दिलीप जगड उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रा. डॉ. श्रद्धा प्रसाद यांनी हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेची सविस्तर माहीती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी या माणिक महोत्सवी वर्षात आयोजित या माजी विद्यार्थी मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक महाविद्यालयाचे माणिक मोती म्हणून केले.
माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासात कशी महत्वाची भूमिका बजावू शकतात हे सोदाहरण स्पष्ट केले. या प्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख व माजी विद्यार्थी संघटना प्रमुख प्रा. डॉ. गुलाब गुगळे यांनी संकलित केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कामी निराली प्रकाशन संस्थेचे प्रमुख जिग्नेश फुरीया यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी न्यायमूर्ती मैथिली मेढेकर, नगरसेवक विशाल धनवडे, निवृत्त विंग कमांडर सदानंद शिर्के, उद्योगपती वैभव ढमढेरे, राज्यकर निरीक्षक अफनान शेख, व्यावसायिक समीर पंड्या, उपशिक्षण अधिकारी शालिनी किरकल आदि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे आणि माजी प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापक ज्योती कणसे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. शैलजा गुजराती आणि प्रा. सुधा आद्या यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मेघा सोनवणे यांनी आभार मानले. डॉ. स्वप्नील सांगोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
