महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पिंपरी- चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी या परीक्षेमध्ये शेकडा 80 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांचा सत्कार यूपीएससी परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीतील आय. डी. एस. अधिकारी डॉ. सुदर्शन लोढा, उद्योजक राहुल मुनोत, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, अध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. लोढा म्हणाले “युपीएससी सारख्या उच्च आणि कठीणतम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जिद्द, परिश्रम, सखोल अभ्यास करण्याची तयारी आणि चिकाटी या गोष्टींची आवश्यकता असते. कठोर परिश्रमाला पर्याय नाही हेच खरं आहे.
नियोजन योग्य असेल आणि त्याप्रमाणे अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते.” डॉ. अशोककुमार पगारिया यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. प्रकाश कटारिया यांनी अतिथींचा परिचय करून दिला. उमेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्रेयस पगारिया यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी महासंघाचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष विलास पगारिया, सुर्यकांत मुथियान, तसेच महामंत्री विजय भिलवडे, विविध जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनामध्ये महासंघाचे पदाधिकारी हितेश सुराणा, संदेश गदिया, तुषार मुथा, श्रेणिक मंडलेचा, अभिनंदन छाजेड, सचिन कोगनाळे, शुभम कटारिया, संदिप फुलफगर आदिंनी परिश्रम घेतले.
