वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त बहुमोल विचारधन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आपण जेव्हा देवाला प्रणाम करतो तेव्हा समर्पणाची भावना आपण तोलत नाही. आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपण देवाला समर्पित करतो हातचं काही राखून ठेवत नाही आपल्याकडे जे काही आहे ते आपण देवाला समर्पित करतो म्हणूनच देवाला दिलेल्या दानात समर्पणाची भावना महत्त्वाची आहे असे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
प.पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, पर्युषण पर्व ‘पर्व’ नाही उत्सव आहे. आणि हा उत्सव आनंदासाठी आहे सत्संगाने आपण जगाला जाणून घ्यायचा प्रयत्न करतो परंतु एक जग आपल्या प्रेमात, आनंदात, आदरात वसलेले आहे. ते एक विलक्षण जग आहे ते बाहेरून येत नाही.
ज्ञान बाहेरून येते, आचरण बाहेरून येते परंतु आपली श्रद्धा, आपले प्रेम आतून येते व ते जितके समृद्ध असेल तेवढा आपल्या जीवाला आनंद मिळेल. आपल्या प्रेमाला अगणित ‘आयाम’ आहेत. आपण आपल्या आई-वडिलांवर, गुरुजनांवर, मित्रांवर, शेजाऱ्यांवर, देशांच्या नेत्यांवर, समाजकार्य करणाऱ्या लोकांवर प्रेम करतो. हे प्रेम आपले आतून येते आपण एखाद्याला दान देतो.
आपल्या आई-वडिलांना दान देतो, गुरूंना देतो, देवाला देतो ते आपण प्रेमापोटीच देतो. आपण कोणालाही नमस्कार करतो, त्याने फरक पडतो. आपण देवाला सगळं काही समर्पित करतो तसंच श्रद्धेलाही हातचं काहीही राखून न ठेवता समर्पित करा.
क्रोध, अहंकार, माया एकतर्फी असते मात्र श्रद्धा, प्रेम, माया एकतर्फी नसते. हजारो वर्ष त्या परमात्मावर आपण आपल्याला सोपविले आहे. महावीरांचे जीवन अद्भुत होते. त्यांनी केवळ ज्ञान देऊन अनंतप्रभेला प्राप्त केले आणि त्यांनी लाखो साधकांना ज्ञानाच्या अथांग सागरात चालण्याची दीक्षा दिली.
महावीरांनी प्रेमाच्या झाडावर मेहनत घेत त्याचे वटवृक्ष बनविले. आपल्या अंतरात वसलेल्या करुणेला मोकळे केले. ते अहिंसेचे देवता बनले. ते म्हणाले, जसं तुम्हाला जगायचंय तसेच दुसऱ्यांनाही जगायचंय, जसं तुम्हाला सुखदुःख आहे तसे दुसऱ्यालाही आहे.महावीरांनी आपल्या ज्ञानात सगळ्या सृष्टीला सामावून घेतले आणि प्रत्येक जीवाला प्रेमाचा संदेश दिला. असा हा प्रेमाचा मसीहा आहे.
